तिसरा अहवाल आल्यानंतर ‘दीनानाथ’ वर कारवाई – उपमुख्यमंत्री अजित पवार
तनिषा भिसे हिच्या मृत्यूबाबत आरोग्य विभागाच्या चौकशी समितीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जबाबदार धरले आहे. धर्मादाय आयुक्तांचा देखील अहवाल आला आहे. माझ्या माहितीप्रमाणे या प्रकरणी दोन अहवाल मुख्यमंत्र्यांकडे आले आहेत. तिसरा अहवाल आल्यानंतर शासन योग्य ती कारवाई करेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन केल्यानंतर अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री आज पुण्यात मुक्कामी येणार आहेत. उद्या शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे. रायगडावर अमित शहा येणार आहेत. आम्ही रायगडला जाणार आहोत. तेथे मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर
याबाबत मी त्यांना याबाबत विचारेन.
प्रत्येक माणसाचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामध्ये कुणीही असा हलगर्जीपणा करता कामा नये. वैद्यकीय क्षेत्रात दोन पैसे कमवण्यापेक्षा सेवाभावी वृत्ती लक्षात घेऊन काम केले पाहिजे. पैशांअभावी कुणाचे उपचार नाकारू नयेत, असे कोणी करत असेल तर खपवून घेणार नाही’, असा इशारा देखील अजित पवारांनी दिला.
आर्थिक संकटावर मार्ग काढू…
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अर्थखात्याकडून परिपूर्ती निधी मिळत नसल्याचे सांगत आर्थिक संकटाचे खापर अर्थखात्यावर फोडले होते. त्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, ‘एसटीमध्ये सवलती देत असताना बजेटमध्ये तरतदू करत असतो. देशात, जगात पब्लिक ट्रान्सपोर्ट सर्व्हिस कधीच फायद्यात नसते, अशी माझी माहिती आहे. बीओटी तत्त्वावर जागा देऊन इन्कम वाढवण्याचा प्रयत्न आहे. परिवहन विभागाच्या सरकाऱ्यांशी तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन यातून मार्ग काढला जाईल.’
पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटेल
रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटामध्ये रस्सीखेच आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावर आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. मात्र, अजून याबाबतचा तिढा सुटला नाही. त्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातले आहे.’
माझ्या बहिणीवर उपोषणाची वेळ येऊ नये…
अधिकाऱ्यांना सांगितलं की, ‘कुणालाही उपोषण करण्याची पाळी येता कामा नये, माझ्या बहिणीला पण येता कामा नये’, असे सांगत उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवारांनी अधिकाऱ्यांना रस्त्याच्या कामाच्या सूचना दिल्या. श्रीक्षेत्र बनेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम करावे, या मागणीसाठी खासदार सुळेंनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्याची दखल घेत अजित पवारांनी अधिकाऱ्यांना कामाला लावले. भोरमधील श्रीक्षेत्र बनेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम करण्यासाठी 9 एप्रिलला सुप्रिया सुळे यांनी उपोषण केले होते. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे व अधिकाऱ्यांनी मे महिन्यात कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी उपोषण सोडले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List