सूड घ्या! देशभरात उसळला संताप!! हिंदुस्थानने पाकिस्तानला घेरले; व्हिसा रद्द, पाकिस्तानींनो 48 तासांत देश सोडा…
पहलगामच्या बैसरण खोऱ्यात झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याने जम्मू-कश्मीरमधील दहशतवाद संपल्याच्या वल्गना करणारे केंद्रातील भाजप सरकार उघडे पडले आहे. या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांना जीव गमवावा लागल्याने देशभरात संतापाची लाट उसळली असून ‘पाकिस्तानला कायमची अद्दल घडवा. नुसते इशारे नको, दहशतवाद ठेचून काढा, सूड घ्या,’ अशी तीव्र प्रतिक्रिया आज उमटली. तणावाखाली असलेल्या जम्मू-कश्मीरात विरोधक आणि सत्ताधाऱयांनी एकत्र येत कडकडीत बंद पाळला. अनेक भागांत तीव्र निदर्शने झाली, जाळपोळ करण्यात आली, पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला, तर देशभरातही पडसाद उमटले. महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून उग्र निदर्शने केली आणि मोदी-शहांच्या फोटोंसमोर बांगड्या ठेवत राजीनाम्याची मागणी केली.
लश्कर ए तोयबाचा मोस्ट वॉण्टेड दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड सैफुल्लाह खालिद ऊर्फ सैफुल्लाह कसुरी हा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचे उघड झाले आहे. तोच द रेजिस्टंट प्रंट चालवत असून पाकिस्तानात बसून त्याने कट रचला. पाकव्याप्त कश्मीरमधील रावळकोटमध्ये त्याचा अड्डा असून हल्ल्याची धमकी देणारा त्याचा महिनाभरापूर्वीचा व्हिडीओही समोर आला आहे. दरम्यान, 1 ते 7 एप्रिलदरम्यान रेकी करण्यात आली आणि नियोजनबद्धरीत्या पहलगाममध्ये हल्ला करून दहशतवादी निसटल्याचे स्पष्ट झाले आहे.
मृतांच्या नातेवाईकांना न्याय द्या, आम्ही सरकारसोबत – राहुल गांधी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी चर्चा केली व स्थितीची माहिती घेतली. त्याचवेळी पीडित कुटुंबांना न्याय मिळायला हवा. आम्ही सरकारसोबत आहोत, असे राहुल गांधी यांनी नमूद केले. दरम्यान अमेरिका व इंग्लंड दौरा अर्धवट सोडून राहुल हिंदुस्थानात परतले.
योग्य वेळी बदला घेऊ – राजनाथ सिंह
पहलगाम हल्ल्याचा बदला योग्य वेळी घेतला जाईल. हिंदुस्थान दहशतवाद्यांना अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही. दहशतवादाविरुद्ध कोणतीही तडजोड मान्य नाही, अशी प्रतिक्रिया संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. राजनाथ यांनी तिन्ही दलांचे प्रमुख आणि संरक्षण दल प्रमुख (सीडीएस) अनिल चौहान यांची बैठक घेऊन स्थितीचा आढावा घेतला.
दोन हजार पर्यटक, पण सुरक्षा नाही
हल्ला झाला तेव्हा घटनास्थळी तब्बल दोन हजार पर्यटक होते. तिथे कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली नव्हती. ही सुरक्षा व्यवस्थेतील चूक असल्याचे संबंधित यंत्रणांमधील अधिकाऱयांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर मान्य केले आहे.
मोदींनी विमानतळावरच घेतली बैठक
सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळीच दिल्लीत परतले. विमानतळावरच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी त्यांनी चर्चा केली. घटनास्थळी दाखल झालेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही मोदींनी फोनवरून संवाद साधला.
मृतांची नावे – हेमंत जोशी, अतुल मोने, संजय लेले – डोंबिवली, दिलीप दिसले-पनवेल, संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटे- पुणे, सुशील नाठयाल- इंदुर, सईद अदील शहा-पहलगाम, विनय नरवाल- हरयाणा, नीरज उधवानी – उत्तराखंड, बितन अधिकारी- कोलकाता, सुदीप नुकणे- नेपाळ, शुभम द्विवेदी- उत्तर प्रदेश, प्रशांत कुमार -ओदिशा, मनिष रंजन- बिहार, एन रामचंद्र- केरळ, दिनेश अग्रवाल- चंदीगड, समीर गुहार, जे मोली, मधुसूदन सोमीशेट्टी, भारत भूषण, मंजुनाथ राव, सुमित परमार, यतिश परमार, शैलेष कलथिया, टागे हेलियांग.
महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू
दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला. यात डोंबिवलीतील संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी यांचा तर पनवेलमधील दिलीप देसले आणि पुण्यातील संतोष जगदाळे तसेच काwस्तुभ गणबोटे यांचा समावेश आहे. देसले यांच्यासोबत असलेले सुबोध पाटील हे आणि संतोष जगदाळे यांच्या पत्नी गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या श्रीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती लष्करी अधिकाऱयांनी दिली.
नातेवाईकांचा आक्रोश…
पहलगाममध्ये दाखल झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांना नातेवाईकांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागले. ‘आमची चूक काय होती,’ असा संतप्त सवाल नातेवाईकांनी केला तेव्हा अमित शहा निरुत्तर झाले.
अमित शहा राजीनामा द्या, विरोधक आक्रमक
पहलगाम हल्ला हे केंद्राच्या धोरणांचे अपयश असून कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-कश्मीरातील दहशतवाद संपल्याचे हवेत दावे करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी आज विरोधी पक्षांनी केली. अमित शहा हे अपयशी गृहमंत्री आहेत. भाजपने निषेधाची नौटंकी थांबवावी आणि मोदींनी अमित शहांचा राजीनामा घ्यावा, अशी तीव्र प्रतिक्रिया शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली.
हेच ते अतिरेकी!
हल्ल्यात पाच पाकिस्तानी आणि दोन स्थानिक दहशतवाद्यांचा समावेश होता. त्यातील आसीफ फौजी, सुलेमान शाह, अबू तल्हा या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी करण्यात आली आहेत. मुसा, युनूस आणि आसीफ अशी त्यांची सांकेतिक नावे आहेत. तर पठाणी सुटात हातात एके-47 असलेल्या दहशतवाद्याचा पाठमोरा फोटो समोर आला आहे. चार दहशतवाद्यांचा एकत्रित फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, मात्र त्याबाबत कोणताही अधिकृत तपशील देण्यात आलेला नाही. घटनास्थळावरून नंबर प्लेट नसलेली एक दुचाकी ताब्यात घेण्यात आली आहे.
हिंदुस्थानने पाकिस्तानला घेरले!
- पाकिस्तानचे पाणी तोडले.
- सिंधू करार स्थगित.
- व्हिसा रद्द.
- अटारी सीमेवरील संयुक्त चेकपोस्ट तत्काळ बंद.
- दूतावासातील सल्लागारांना देश सोडण्याचे फर्मान.
- इस्लामाबादच्या दूतावासात कर्मचारी कपात केली.
- पाकिस्तानींनो 48 तासांत देश सोडा.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List