पाकिस्तानी नागरिकांना हिंदुस्थान सोडण्याचे आदेश; अटारी सीमा बंद, सिंधु पाणी करारही स्थगित
जम्मू-कश्मीरात पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. याचे तीव्र पडसाद देशभरात उमटत असून, सर्वत्र संतापाची लाट आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीची बैठक झाली. त्यात पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत हिंदुस्थान सोडण्याचे आदेश, अटारी सीमा बंदसह पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
या बैठकीनंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य ओळखून सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीने पाच निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
हे आहेत निर्णय
z 1960 चा सिंधु पाणी करार तत्काळ स्थगित करण्यात येत आहे. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवाद्यांना पाठिंबा देत राहील तोपर्यंत हा करार स्थगित राहणार आहे.
z दोन्ही देशांची महत्त्वाची संयुक्त चेकपोस्ट असलेली अटारी सीमा तत्काळ बंद करण्यात येत आहे. ज्यांनी अटारी सीमा ओलांडली आहे त्यांनी 1 मे 2025 पर्यंत परत जावे.
z पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा योजनेअंतर्गत हिंदुस्थानात प्रवास करण्याची परवानगी होती. आता ती तत्काळ रद्द करण्यात आली आहे. जे पाकिस्तानी नागरिक या व्हिसाद्वारे हिंदुस्थानात आले आहेत त्यांनी 48 तासांत हिंदुस्थान सोडून निघून जावे.
z नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तातील संरक्षण, लष्कर, नौदल आणि हवाई दल अधिकाऱ्यांची पदे रद्द करण्यात आली आहेत. या अधिकाऱ्यांनी एक आठवडय़ात हिंदुस्थान सोडून निघून जावे.
z इस्लामाबादमधील हिंदुस्थानी उच्चायुक्तालयातील संरक्षण, नौदल, हवाई दल सल्लागारांना मायदेशी बोलविणार. उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांची संख्या 55 वरून 30 पर्यंत कमी करणार.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List