बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन शूट करून मराठमोळी अभिनेत्री अस्वस्थ; बोलणं झालं बंद, कसं सुधारलं नातं?
मराठमोळ्या अदिती पोहणकरने ‘आश्रम’ या वेब सीरिजमध्ये जबरदस्त भूमिका साकारली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती या सीरिजमधील अभिनेता बॉबी देओलसोबतच्या इंटिमेट सीन्सबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. असे सीन्स ऑनस्क्रीन अत्यंत सहजरित्या दाखवण्यासाठी एकमेकांवरील विश्वास आणि कम्फर्ट या गोष्टी खूप महत्त्वाच्या असल्याचं ती म्हणाली. या सीरिजमध्ये तिने पम्मीची भूमिका साकारली आहे. ‘आश्रम’चे तिन्ही सिझन तुफान गाजले. ‘इंडिया टुडे डिजिटल’ला दिलेल्या मुलाखतीत अदितीने इंटिमेट सीन्सच्या विविध भावनिक आणि मानसिक थरांचा उलगडा केला.
“इंटिमेट सीन्स शूट करणं खूप कठीण”
“इंटिमेट सीन्स शूट करणं खूप कठीण असतं कारण त्यासाठी दोन्ही कलाकार एकमेकांसोबत कम्फर्टेबल असावे लागतात. इम्तियाज सरांनी मला एकदा सांगितलं होतं की अनेकदा अशा सीन्सच्या शूटिंगदरम्यान पुरुष अतिउत्तेजित होतात. त्यामुळे तुमच्या सहकलाकाराची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. तुम्हाला सतत विचारावं लागतं की, काही झालंय का? तू ठीक आहेस का? समोरची व्यक्ती सुरक्षित आहे का याची खात्री करावी लागते. अशा पद्धतीने आम्ही ‘शी’ आणि ‘आश्रम’मधील सीन्स शूट केले आहेत”, असं अदिती म्हणाली.
बॉबी देओलसोबत कसं शूटिंग केलं?
याविषयी तिने पुढे सांगितलं, “आश्रमच्या वेळी आमची मैत्री खूप घट्ट होती. उदाहरण द्यायचं झाल्यास, जर एखादा सीन चांगला शूट झाला नाही आणि दिग्दर्शकाने कट म्हटलं तर एकसंधपणा येण्यासाठी आम्हाला आमची पोझिशन बदलता यायची नाही. मग अशा क्षणांदरम्यान आम्ही एकमेकांची विचारपूस करायचो.” विशेष म्हणजे अशा सीन्सच्या शूटिंगच्या वेळी सेटवर इंटिमसी को-ऑर्डिनेटर्सपण नव्हते. सध्या कोणत्याही चित्रपटात किंवा वेब सीरिजमध्ये किंवा मालिकेत इंटिमेट सीन्स शूट करायचे असतात, तेव्हा सेटवर आवर्जून इंटिमसी को-ऑर्डिनेटर उपस्थित असतो.
“अशी कोणती व्यक्ती असते किंवा अशी एखादी संकल्पना आहे, हे मला त्यावेळी माहीतसुद्धा नव्हतं. पण मला खरंच असं वाटतं की दोन कलाकारांमध्ये जितकी कमी बाँडिंग असते, तितके ऑनस्क्रीन ते संकोचल्यासारखे दिसतात. म्हणून एकमेकांशी बोलून, थोडीफार मैत्री करून शूटिंग करणं खूप चांगलं असतं. अर्थातच इंटिमसी दिग्दर्शक तुमची मदत करतात, पण जेव्हा दोन कलाकारांमध्ये भावनिक दुरावा नसतो, तेव्हा खरा कम्फर्ट सीनमध्येही दिसून येतो”, असं अदिती म्हणाली.
ऑनस्क्रीन केमिस्ट्रीबद्दल काय म्हणाली अदिती?
ऑनस्क्रीन दिसणाऱ्या केमिस्ट्रीबद्दल अदितीने सांगितलं, “जेव्हा दोघे कलाकार एकमेकांसोबत सुरक्षित असतात आणि त्यांच्यात सर्वकाही आपोआप घडू लागतं, त्यातच अशा सीन्सचं सौंदर्य दडलेलं असतं. तुम्ही त्या क्षणाला वाहवत नेता. ते घडू देण्यात काहीच चुकीचं नाही कारण दोघांनाही त्यांची मर्यादा माहीत असते. ती मर्यादा तुम्ही किंवा समोरची व्यक्ती ओलांडत नाही. ती ओलांडायचीही नसते. अभिनेता किंवा अभिनेत्री.. कोणालाच भीती वाटू नये. जेव्हा विश्वास असतो, तेव्हा सीन्स तितके सहज शूट होतात. आपल्याला शरीराला सूचना लगेच कळतात. आम्ही मर्यादांना समजून घेतो आणि त्यांचा आदर करतो. ती सुरक्षेची भावनाच सर्वकाही असते.”
यावेळी अदितीने ‘आश्रम’ सीरिजच्या शूटिंगदरम्यानचा एक मजेशीर किस्सादेखील सांगितला. “आमच्यातील तणाव किंवा संकोचलेपणा त्यावेळी दूर झाला जेव्हा मी त्याचं सगळं जेवण जेवले होते. तो म्हणाला, माझं लिट्टी-चोखा खाऊन टाकलंस. त्यावर मी इतकंच म्हणाले की, होय.. खाऊन टाकलं. त्याचं जेवण जेवण्यापूर्वी मी फारसा विचार केला नव्हता. पण नंतर त्याच्यासाठी मी आलू टिक्की ऑर्डर केली होती. पण त्याला ती खूपच तिखट वाटली म्हणून तीसुद्धा मीच खाऊन टाकली होती. अशाप्रकारे आमच्यातील नातं हलकंफुलकं होत गेलं आणि आमच्यातील संकोचलेपणा दूर झाला”, असा खुलासा अदितीने केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List