आनंदवार्ता! यंदा सरासरीच्या 103 टक्के पाऊस बरसणार; स्कायमेटचा पावसाचा पहिला अंदाज जाहीर
देशातील महत्त्वाची हवामान विषयक अंदाज करणारी संस्था स्कायमेटनं मान्सून 2025 साठीचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. त्यामुळे उन्हाचा ताप सहन करणाऱ्या जनतेला थोडा दिलासा मिळाला आहे. यंदा पाऊस सरासरीच्या 103 टक्के पडणार आहे. तसेच तो वेळेत येण्याची शक्यता स्कायमेटनं वर्तवली आहे. त्यासह एप्रिल ते जून ा काळात उन्हाचा ताप आणखी वाढणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
स्कायमेटनं मान्सूनचा यंदाचा हंगाम सामान्य राहील, असा अंदाज वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सूनचा पाऊस सरासरीच्या 103 टक्के होईल, त्यात 5 टक्क्यांची वाढ किंवा घट होऊ शकते. जून ते सप्टेंबर या कालावधीत दीर्घकालीन सरासरी 868.6 एमएम पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ला निना या हंगामात कमकुवत असणार आहे. तसेच मान्सूनवर विपरीत परिणाम करण्याऱ्या एलनिनोची शक्यता नाकारण्यात आली आहे. त्यामुळे यंदा पावसावर एल निनोचे सावट नसेल. ला निना कमकुवत असणं आणि एलनिनो प्रभावी नसल्यानं मान्सूनचा पाऊस चांगला होऊ शकतो. हिंदी महासागरातील स्थिती एलनिनो प्रभावी न होण्यासाठी उपयोगी ठरु शकते. त्यामुळं मान्सूनचा पाऊस चांगला राहू शकतो, असा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यात चांगला पाऊस होऊ शकतो, असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.
आयओडी (इंडियन ओसियन डायपोल) सध्या प्रभावहीन असून यामुळं मान्सूनच्या सुरुवातीसाठी सकारात्मक चित्र आहे. त्यामुळे पावसाचे आगमन वेळेवर होण्याची शक्यता आहे. एलनिनो दक्षिणी दोलन आणि आयओडी दोन्ही मान्सूनच्या प्रवासावर परिणाम करतात. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात मान्सूनला अधिक वेग मिळू शकतो, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार देशाच्या पश्चिम आणि दक्षिण भागात चांगला पाऊस होईल. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रत पुरेसा पाऊस होईल. पश्चिम घाट,प्रामुख्यानं केरळ, कर्नाटकचा किनारपट्टीचा भाग आणि गोव्यात अधिक पाऊस होईल. उत्तरेकडील राज्य आणि पर्वतीय भागात सरासरीच्या पेक्षा कमी पाऊस होईल. जून महिन्यात सरासरीच्या 96 टक्के म्हणजे सामान्य पाऊस राहू शकतो. या महिन्यात 165.3 मिलीमीटर पावसाची नोंद होईल. जुलै महिन्यात 1023 टक्के पाऊस होईल तर 280.5 मिलीमीटर पावसाची नोंद होईल असा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 108 टक्के पाऊस होऊ शकतो. या महिन्यात 254.9 मिलीमीटर पाऊस होऊ शकतो. सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या 104 टक्के पावसाची नोंद होऊ शकते. तर,167.9 मिलीमीटर पावसाची नोंद होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List