IPL 2025 – दोन्ही संघांची तुफान फटकेबाजी, अटीतटीच्या लढतीत लखनऊची बाजी; KKR चा 4 धावांनी पराभव
लखनऊच्या संघाने 238 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर त्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या KKR ने धुवाँधार फलंदाजी करत सामना अगदी शेवटच्या षटकापर्यंत आणला. कर्णधार अजिंक्य रहाणे (61 धावा) आणि वेंकटेश अय्यर (45 धावा) यांनी मधल्या फळीत आक्रमक पवित्रा दाखवत संघाला विजयाच्या दिशेने नेले. त्यानंत रिंकू सिंगने 15 चेंडूंमध्ये 38 धावांची वादळी खेळी केली परंतु इतर फलंदाज अपयशी ठरल्यामुळे संघाचा अवघ्या 4 धावांनी पराभव झाला.
नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर अजिंक्य रहाणेने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. अजिंक्य राहणेच्या निर्णयाला लखनऊच्या फलंदाजांनी सडेतोड उत्तर दिले. सलामीला आलेल्या मार्करम (47 धावा) आणि मिचेल मार्श यांनी तोडफोड फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी 99 धावांची भागी केली. मार्शने 48 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 5 षटाकारांच्या मदतीने 81 धावा चोपून काढल्या. त्यानंतर आलेला निकोलस पुरन टॉप गिअर टाकूनच मैदानात उतरला, त्याने 36 चेंडूचा सामना करत 7 चौकार आणि खणखणीत 8 षटाकारांच्या जोरावर 87 धावांची नाबाद खेळी केली. लखनऊच्या तीन फलंदाजांनी कोलकाताच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत 3 गड्यांच्या मोबदल्यात 238 धावा केल्या आणि कोलकाताला 239 धावांचे आव्हान दिले होते.
अशक्यप्राय वाटणारे आव्हान कोलकाता पेलणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. कारण 37 या धावसंख्येवर कोलकाताला डी कॉकच्या स्वरुपात पहिला हादरा बसला. त्यानंर सुनील नरेन (30 धावा) कर्णधार अजिंक्य रहाणे (61 धावा) आणि वेंकटेश अय्यर (45 धावा) यांनी ताबडतोब फलंदाजी करत संघाच्या आशा पल्लवीत केल्या. परंतु त्यानंतर झटपट विकेट गेल्याने 185 धावांवर 7 विकेट अशी कोलकाताची अवस्था झाली होती. परंतु रिंकू सिंगने विस्फोटक फलंदाजी करत सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. कोलकाताला 7 गड्यांच्या मोबदल्यात 234 धावांपर्यंत मजल मारता आली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List