आता भाजपला ‘खांदा द्यायची’ वेळ आलीय… निर्धार शिबीरात शिवसेनाप्रमुखांचा आवाज घुमला आणि शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिणींनो आणि मातांनो… कमळाबाई म्हणजे एक ढोंग आहे ढोंग, देशात यांना कुणीच ओळखत नव्हतं तेव्हा आम्ही त्यांना आधाराचा खांदा दिला. महाराष्ट्रात त्यांना आम्हीच वाढवलं पण आता त्यांना खांदा द्यायची वेळ आलीय… हिंदुहृद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील हे वाक्य कानावर पडलं आणि मनोहर गार्डन सभागृहात उपस्थित प्रत्येक शिवसैनिकाच्या अंगावर काटा आला. आपले साहेब बोलतायत, तोच आवाज, तो ठाकरी बाणा सभागृहात घुमला आणि शिवसैनिक प्रचंड उत्साह संचारला. यावेळी हिंदुहृयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील एक चित्रफित दाखवण्यात आली. या चित्रफितीतून शिवसेनाप्रमुखांच्या स्टाईलमध्ये भाजप, मिंधे गटाची सालटी काढण्यात आली.
हिंदुहृयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील भाषण –
जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो भगिणींनो आणि मातांनो… आज तुफान गर्दी दिसतेय. नाशिक म्हटलं तर गर्दी उसळणारच. नाशिक आणि शिवसेनेचं एक नातं आहे आणि ते राहणारच. नरेंद्र मोदी म्हणतात तसं हे नातं नाही. नासिकसे मेरा पुराना नाता है. में यहाँ वीर सावरकर जी के साथ काम करता था. जातील तिथे गंडवायचं आहे. ही काही नाती जपणारी माणसं नाहीत. कमळाबाई म्हणजे एक ढोंग आहे ढोंग, देशात यांना कुणीच ओळखत नव्हतं तेव्हा आम्ही त्यांना आधाराचा खांदा दिला. महाराष्ट्रात त्यांना आम्हीच वाढवलं पण आता त्यांना खांदा द्यायची वेळ आलीय… 25 वर्ष आमचं एक नातं त्यांच्याबरोबर हिंदुत्व म्हणून एक नातं नक्कीच होतं. महाराष्ट्रात शिवसेनेमुळे ते वाढले. मग नातं मोडलं कुणी. माझ्या पोतडीत यांच्या खूप गोष्टी आहेत. हळू हळू काढतो… त्यातच मजा असते.
नाशिकककर मला विसरूच शकत नाही. अरे बाबांनो शिवसेना आहे म्हणून तुम्ही आहात. हा जो समोर साधा शिवसैनिक बसलाय ना तो महत्त्वाचा आहे. त्याने तुम्हाला आमदार खासदार बनवलं. सध्या बातम्या सुरू आहेत, हा गेला तो गेला. अस्वलाच्या अंगावरचे दोन चार केस उपटले तर काय फरक पडतो. आता ही सगळी नवीन मंडळी आली आहेत. नाशिकचं गोल्फ मैदान गाजवलंय. सभेला पैसे देऊन माणसं आणण्याचा दळभद्रीपणा आम्हाला कधीच करावा लागला नाही. आई जगदंबेची तेवढी कृपा आमच्यावर आहे व ती राहणारच.
या विधानसभेच्या निवडणूकीत काय झालं. जो निकाल लागला तो तुम्हाला मान्य आहे का? बडगुजर, योगेश घोलप, वसंत गिते, अनिल कदम अद्वय हिरे, अनिल गोटे हे मैदानात होते, लोकांची कामं केली, राबराब राबले, लोकांची कामं केली पण निकाल उलटेच लागले. भाजप व त्या नकली शिवसेनेने असे काय दिवे लागले की त्यांना भरभरून मतं मिळाली. लोकशाहीत असे निकाल जबरदस्तीने लावले जाणार असतील तर कसले स्वातंत्र्य आणि कसले काय? ही लोकशाही आम्ही मान्य करणारच नाही. हे असेच सुरू राहणार असेल तर आम्हाला वीर सावरकरांच्या क्रांतीच्या मार्गाने जावंच लागेल. होय हे मी सावरकरांच्या नाशिकमध्ये बोलतोय. टाका आणखी एक खटला माझ्यावर नाहीतरी माझ्या शिवसैनिकांवर खोटे खटले टाकताय ना. टाका. हा माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र आहे. कुणाच्या पाठीत वार करणार नाही. पण महाराष्ट्राच्या पाठीत वारच सुरू आहेत. सगळा पैशांचा खेळ महाराष्ट्र इंग्रज व मुघलांनी लुटला नव्हता तेवढा भाजपवाल्यांच्या टोळ्या लुटतायत, ते सुद्धा हिंदुत्वाच्या नावाखाली. भाजपला आम्ही हिंदुत्वासाठीच मोठे केले. आज हिंदुत्वाचे मारेकरी कोण असतील तर हेच भाजपवाले आहेत. हिंदुत्व ही काही तुमची खाजगी मालमत्ता नाही. हिंदू हिंदूमध्ये भांडणं लावली जातायत. जाती जातींमध्ये भांडणं लावून ते नाना फडणवीस मजा बघतायत. पण एक गोष्ट ठासून सांगतो. तुमचे शंभर बाप खाली उतरले तरी शिवसेनेचे अस्तित्व संपवता येणार नाही. शिवसेनेने गेल्या पन्नास वर्षात किती सोसलंय. सतत आव्हानं दिली गेली व आम्ही ती स्वीकारलीही. पाच पिढ्या शिवसेनेच्या विचाराने भारल्या गेल्या आहेतच. त्यांच्या रक्तात स्वार्थाचा नाही तर राष्ट्रीयत्वाची उर्जा शिवसेनेने निर्माण केली. जे नामर्द डरपोक जे गेले ते गेले. त्यांची लाकडं शिवसेना सोलापूरात रचल्याशिवाय राहणार नाही. माझी शिवसेना एख कुटुंब आहे व राहिल. आज महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे, अवकाळीने शेतकरी गार झालाय, आहे त्याला कुणी वाली. कर्जाचा डोंगर घेऊन जगतोय… अरे जगतोय कसला रोज आत्महत्या करातायत. ते कृषी मंत्री कोकाटे कोकाटत फिरतायत. शेतकऱ्यांची कर्ज माफ करणार होतात ना. मग काय झालं? का शेपूट घातले. शेतकऱ्यांची इतकी फसवणूक करून सुद्धा तुम्ही उघड़पणे फिरता, लाजा वाटत नाही तुम्हाला. शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालाय, आरोग्यसेवेचे धिंडवडे निघाले आहेत, उद्योगधंदे बंद होतायत. अहो तुमच्या नाशिकमध्ये किती नवे उद्योग आले. फडणवीस गुंतवणूक आणण्याच्या नावाखाली काय आले. भोपळा. हे किती वेळ बघणार. बघून थंड बसणार असाल तर त्या छत्रपती शिवरायांचं देखील नाव घेऊ नका. जय भवानी जय शिवाजीचा देखील गजर करू नकाय
महाराष्ट्राला लाचार व गुलाम करण्यासाठी त्या व्यापाऱ्यांनी शिवसेना तोडली. निष्ठावंत म्हणून घेणारे गद्दार व फितूर निघाले. हे गद्दार एक जात दिल्लीपुढे मुजरे झाडतायत, त्यासाठी शिवसैनिकांनी त्याग आणि बलिदान केले, त्यासाठीच 106 हुतात्म्यांनी घरावर तुळशीपत्र ठेवले. मी महाराष्ट्राच्या राजकारणात गरम रक्ताची मर्द पिढी उभी केली होती. काय झाले त्या उसळणाऱ्या गरम रक्ताचे. गद्दार गेले ते गेले. त्यांच्या स्वाभिमान्चाया गोवऱ्या सोलापूरात गेल्या. त्यांना पैसा अडका, मंत्रीपदाच्या वतनदाऱ्या आज मिळाल्या आहेत.
पण इतिहासात तुमची नोंद फितूर, महाराष्ट्राचे गद्दार म्हणूनच राहणार. गंगेत कितीही डुबक्या मारल्या तरी हे पाप गद्दारीचा डाग घुतला जाणार नाही. जिवंतपणी या गद्दारांनी माझ्या पाठीवर वार केले. पण मृत्युनंतरही घाव घालणे सुरूच आहे. ज्या इमान निष्ठेतून शिवसेनेचा अंगार निर्माण झाला, त्यावर बेईमानीच्या गद्दारीच्या गुळण्या टाकणारे तुमच्या रक्ताचे हाडामासाचे लोकं आहेत. छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या नशिबी जे स्वकीयांकडून बेईमानीचे घाव आले तेच आमच्या नशिबी आले. याद राखा गद्दारांनो तुमचे हे मनसुबे पूर्ण होणार नाहीत. खुर्च्यातील ढेकूण होऊन जगणारे त्या खुर्च्यांसह संपेल. निष्ठेच्या वणव्यात फितूरीची राख रांगोळी होईल. माझा महाराष्ट्र फितूरीचा बदला घेईल, छत्रपती शिवराय, शंभूराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी थयथयाट केला. पण मराठा जो पेटला तो महाराष्ट्रात औरंग्याला गडून दिल्ल्याच्या तख्तापर्यंत पोहोचला. माझा शिवसैनिक वाघ आहे वाघ.
यांचं ऑपरेशन सुरू आहेत. त्याच ऑपरेशन टेबलवर पाडून तुमच्या बेईमानीची नसबंदी माझा शिवसैनिक नक्कीच करेल. घोटाळा करून विधानसभा जिंकली. आता मुंबईची महानगरपालिका 106 हुतात्म्यांचा हा पंचप्राण ते विकत घ्यायला निघाले आहेत. हे मी आणि माझा शिवसैनिक होऊ देणार नाही. आम्ही महाराष्ट्राला स्वाभिमानी बनवनं. संकटं वादळं येतील, संकटाच्या छाताडावर पाय देऊन माझा शिवसैनिक शिवसेनेची नौका पुढेच घेऊन जाणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List