कथा एका चवीची- रामनामाचा सुंठवडा
>> रश्मी वारंग
रामनवमी किंवा हनुमान जयंती या दोन्ही सणांना भक्तिभावाने प्रसाद म्हणून सेवन केला जाणारा सुंठवडा. चैत्रातल्या काहिलीत आरोग्याच्या तक्रारींपासून मुक्तता देणारा सुंठवडा अल्प स्वरूपात म्हणजेच प्रसादरूपातच पोटात गेला पाहिजे. म्हणूनच रामजन्माशी जोडलेल्या या प्रसादाची ही गोष्ट.
आपले विविध सण आणि आपली खाद्यसंस्कृती यांचं नातं घट्ट आहे. किंबहुना आपल्या पूर्वजांनी आपल्या आरोग्यासाठी हिताच्या पदार्थांना सणांशी जोडून ते आपल्या आहाराचा भाग राहतील याची काळजी घेतलेली दिसते. इतर वेळी खाण्यासाठी अळमटळम होणारे पदार्थ प्रसाद म्हणून तर आवर्जून खाल्ले जातात. आजचा रामनवमीचा दिवस किंवा हनुमान जयंती या दोन्ही सणांना जो प्रसाद आपण भक्तिभावाने सेवन करतो तो सुंठवडा. रामजन्माशी जोडलेल्या या प्रसादाची ही गोष्ट.
‘राम जन्मला गं सखी राम जन्मला’ म्हणत येणाऱया रामनवमीचा आणि सुंठवडय़ाचा पौराणिक संदर्भ काहीच नाही. हा संबंध ऋतुमानाशी आहे. रामनवमी चैत्र शुद्ध नवमीला येते. अर्थात चैत्र महिन्याचा हा काळ म्हणजे उष्णतेचा, काहिलीने तगमग होण्याचा काळ. चैत्रातील उन्हाने पचन आणि भुकेच्या तक्रारी वाढतात. अपचनामुळे भूकही मंदावते. उन्हाची सर्दी आणि इतर उन्हाळी आजार वाढतात. त्यावर ‘सुंठवडा’ हा अतिशय उत्तम उपाय ठरतो. सुंठ पावडर, पत्री खडीसाखर, सुकं खोबरं, धणे, बडीशेप, वेलची पूड अशा गोष्टींचा वापर करून सुंठवडा बनवला जातो. या सगळ्या गोष्टी शरीरातील उष्णतेसाठी आरोग्यदायी ठरतात.
मुळात सुंठ म्हणजे सुकविलेलं आलं. आल्याला चुन्यामध्ये भिजवून उन्हामध्ये सुकवलं की सुंठ तयार होते. तयार आल्याचा कंद सोलून किंवा न सोलता चुन्याच्या पाण्यात काही तास भिजत ठेवतात. त्यानंतर हे आलं पाण्यातून काढून ते सुकवलं की सुंठ तयार होते. चुन्याचे प्रमाण किती घ्यायचे ते प्रत्येकावर अवलंबून असते.
आल्यामध्ये असलेले सर्व गुण सुंठेमध्ये असतात. पचन संस्थेसाठी सुंठ उपयुक्त आहे. सुंठेमध्ये अनेक उत्तम गुणधर्म असल्यानेच तिला ‘महौषधी’ असं नाव देण्यात आलं आहे. सुंठीला ‘विश्वभेषज’ म्हणजे संपूर्ण जगाचं औषध असंही म्हटलं जातं. ती पाचक, चवीला तिखट, हलकी, स्निग्ध आणि उष्ण असते असं तिचं वर्णन येतं. कोणताही पदार्थ बाधू नये, नीट पचावा, वायूचा त्रास होऊ नये म्हणून गोड पदार्थात सुंठीची पूड घातली जाते. आपल्याकडे ‘पुरणपोळी’ आणि ‘आमरसात’ सुंठ घातली जाते. केवळ पदार्थ बाधू नये म्हणूनच नाही, तर पदार्थाचा दर्जा वाढावा, तो जास्त दिवस टिकावा म्हणूनही सुंठीचा उपयोग केला जातो.
सुंठ पावडरीत गूळ आणि थोडं तूप टाकून त्याचे छोटेछोटे लाडू बनवतात. अपचनावर हा उपाय केला जातो. पावसाळ्यात होणाऱया सर्दीवरही हे लाडू गुणकारी मानले जातात. काही ठिकाणी सुंठपाक बनवला जातो. गाईचं तूप, साखर आणि सुंठपुड यापासून हा पाक बनतो. सुंठ, मिरे, पिंपळी, दालचिनी, वेलदोडा आणि तमालपत्र या सर्व वस्तू प्रत्येकी चार तोळे घेऊन त्यांचं चूर्ण करून, ते पाकात टाकतात. तयार झालेला पाक काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत भरतात. या पाकाला ‘सौभाग्य सुंठपाक’ किंवा ‘सुंठी रसायन’ असं म्हणतात.
भारतीय स्वयंपाकघरातील सुंठीचं हे महत्त्व लक्षात घेतल्यानंतर रामनवमी आणि हनुमान जयंतीला सुंठवडा वापरण्यामागचा तार्किक विचार समजून येतो. चैत्राची काहिली, भूक मंदावणं, पित्ताचा त्रास, जळजळ या सगळ्यापासून मुक्तता देणारा हा सुंठपाक प्रसाद म्हणून आपल्या पोटात ढकलण्याची क्लृप्ती आपल्या पूर्वजांनी आवर्जून केलेली आहे. आलं प्रकृतीने उष्ण. त्यामुळे हा सुंठवडा खूप खाऊनही चालणार नाही. त्यामुळे तो थोडका प्रसादरूपातच पोटात गेला पाहिजे या दृष्टीने रामनवमीशी या सुंठवडय़ाचं नातं जुळलेलं दिसतं.
हनुमान जयंतीचं किंवा रामनवमीचे कीर्तन झालं की सुंठवडा प्रसाद म्हणून वाटण्याची प्रथा अनेक वर्षं महाराष्ट्रात दिसते.
राजीव लोचन भवभयमोचन पतीत पावन राम
श्री रघुनंदन राक्षसकंदन दशमुखछेदन राम
अशा रामाचं रामनवमीला दर्शन घ्यावं. सुंठवडय़ाचा प्रसाद मुखात विसावावा. त्या सुंठवडय़ाच्या चवीसोबतच रामनाम हृदयात कोरलं जातं आणि आपण म्हणत राहतो…जय श्रीराम!
(लेखिका आरजे व स्तंभलेखिका आहेत.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List