साय-फाय – चिनारचा लढा
>> प्रसाद ताम्हनकर, [email protected]
चिनार वृक्ष हे कश्मीर खोऱ्याचे एक महत्त्वाचे प्रतीक मानले जाते. हजारो चिनार वृक्षांनी या प्रदेशाच्या सौंदर्यात खूप सुंदर भर घातलेली आहे. सध्या हे वृक्ष अस्तित्वासाठी लढा देत आहेत असे इथल्या अनेक स्थानिक लोकांना वाटत आहे आणि त्यांनी या वृक्षांच्या बचावासाठी मोहीम उभारली आहे. काही दिवसांपूर्वी सरकारतर्फे अनंतनाग इथे बेकायदा वृक्षतोड करण्यात आल्याचे फोटो सोशल मीडियावर अनेक युजर्सनी शेअर केले होते आणि त्याविरोधात आवाज उठवला होता. सरकार मात्र ही नियमित छाटणी असल्याचा दावा करत आहे. गेल्या काही वर्षांत रस्ते बांधणी, वाढते शहरीकरण आणि कीटकांचा प्रादुर्भाव यामुळेदेखील या वृक्षांच्या अस्तित्वाला धोका वाढत चाललेला आहे.
चिनार संरक्षणासाठी स्थानिक पातळीवर चालू असलेला लढा, चिनार वृक्षांच्या अस्तित्वाला असलेल्या धोक्याची अनेक वैज्ञानिकांनी व्यक्त केलेली चिंता याची दखल घेत आता कश्मीर वन विभागाने चिनार वृक्षांच्या जिओ टॅगिंगची मोहीम आखली आहे. त्यामुळे कश्मिरी संस्कृतीचा एक महत्त्वाचा हिस्सा असलेल्या या वृक्षांचे अस्तित्व सुनिश्चित करता येणार आहे. तसेच चिनार ट्री रेकॉर्ड फॉर्ममुळे (CTR-25) प्रत्येक वृक्षाची संपूर्ण माहिती प्राप्त करता येणार आहे. या मोहिमेत प्रत्येक झाडाला भेट देऊन त्याची लांबी, रुंदी, जाडी, त्याचे आरोग्य यांची नोंद घेतली जाईल. गोळा केलेल्या या माहितीचे कोडिंग केले जाईल आणि या कोडिंगची एका पाटीवर प्रिंट काढून ती पाटी झाडाला लावण्यात येईल.
या मोहिमेत चिनारच्या झाडांची नक्की संख्या स्पष्ट होईल. त्यामुळे झाडांचे संरक्षण करणे, त्यांच्या अवैध कापणीला रोखणे सुलभ होणार आहे. चिनारला जम्मू आणि कश्मीर प्रिझर्व्हेशन ऑफ स्पेसिफाइड ट्रीज अॅक्ट, 1969 अंतर्गत संरक्षण देण्यात आले आहे. हा कायदा अजूनही लागू आहे. या कायद्यानुसार चिनार वृक्षाचे एखादे झाड तोडण्यापूर्वी किंवा त्याच्या फांद्यांची लहानशी छाटणी करण्यासाठीदेखील सरकारी परवानगी आवश्यक आहे. मात्र अनेक लोक या कायद्याचे उल्लंघन करतात आणि छाटणीच्या नावाखाली संपूर्ण वृक्ष तोडतात असा इथल्या स्थानिकांचा आरोप आहे. सरकारी इमारतींचे बांधकाम, रस्त्यांची कामे यासाठी अनेकदा सरकारतर्फे या वृक्षांची बेसुमार कत्तल केली गेल्याचा आरोपदेखील केला गेला आहे.
चिनारच्या झाडाला शेकडो वर्षांचे आयुष्य लाभलेले आहे. सध्या कश्मीरमध्ये अस्तित्वात असलेल्या अनेक चिनार वृक्षांचे वय हे 100 ते 300 वर्षांच्या आसपास असल्याचे मानले जाते. काही सरकारी अधिकाऱ्यांच्या मते 50 वर्षांपूर्वी कश्मीरमध्ये 42 हजार चिनार वृक्षाची झाडे होती. सध्या चालू असलेल्या मोहिमेत जवळपास 35 हजार चिनार वृक्षांचे टॅगिंग करण्यात आलेले आहे. स्थानिक पातळीवर लोकांमध्ये जागृती निर्माण करणे, झाडांची अवैध तोड रोखणे आणि सध्या अस्तित्वात असलेल्या झाडांना पूर्ण संरक्षण देणे हे उद्दिष्ट सरकारने बाळगले आहे. यासाठी इथे ‘चिनार दिवस’ (15 मार्च) आणि ‘चिनार फॉल फेस्टिवल’ (15 ऑक्टोबर) मोठय़ा उत्साहात साजरे केले जातात.
कश्मीरच्या गांडरबल भागात सर्वात जास्त चिनार वृक्ष आढळतात. इथे कश्मीरमधला सर्वात मोठा चिनार वृक्षदेखील आहे. 74 फुटांचा हा वृक्ष जगातला तिसरा सर्वात मोठा वृक्षदेखील आहे. आता वन विभागाने या ठिकाणी एक मोठी नर्सरी उभी केली आहे. तज्ञांच्या देखरेखीखाली इथे निरोगी चिनार वृक्षांच्या फांद्यांची लागवड केली जात आहे. कश्मीरच्या वेगवेगळ्या भागांत वृक्षारोपण करण्यासाठी या नर्सरीत तयार होत असलेल्या हजारो फांद्या देण्याचे वन विभागाचे उद्दिष्ट आहे. ते यशस्वी झाल्यास पुढील पाच वर्षात कश्मीरमध्ये 50 हजार ते एक लाख वृक्षांचे रोपण करता येणार आहे. कश्मीरच्या धर्म आणि संस्कृतीचे प्रतीक असलेल्या या वृक्षाने अनेक कथा, चित्रपटांतील गाणी, शेर-शायरी, गझल अशा ठिकाणी मानाचे स्थान मिळवलेले आहे. आगळ्यावेगळ्या अशा या वृक्षाला त्याचा पूर्वीचा तोरा लवकर प्राप्त होवो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List