।। सीतास्वरुपा ।। – करुणामयी
>> वृषाली साठे
‘अन्टोल्ड स्टोरी ऑफ सीता’ या पुस्तकातून डेना मॅरिअम यांनी त्यांच्या शब्दात सांगितलेली ही कथा. सीतामाई आणि राम यांची ही जीवनकथा म्हणजे संपूर्ण भारतवर्षाची कहाणी आहे.
विवाह झाल्यावर जनकबाबा या चारही दासींना म्हणजे सोमा, मीनाक्षी, उषा आणि रोहणा यांना विचारतात की, त्या सीतामाईबरोबर अयोध्येला जायला तयार आहेत का? चारही जणी सीतामाईबरोबर जायला तयार होतात, तेव्हा जनकबाबा चारीजणींना जवळ घेतात आणि सांगतात की, ज्याप्रमाणे माझ्यासाठी सीतामाई आणि उर्मिला आहेत त्याप्रमाणे तुम्ही पण माझ्याच कन्या आहात. मीनाक्षीला खूप भरून येतं. तिला तिच्या वडिलांची खूप आठवण येते.
लहानपणीच मीनाक्षीला तिच्या वडिलांनी त्यांच्या घराण्याला असलेल्या शापाबद्दल सांगितलं होतं. त्यांच्या घरात कोणाही मुलीचं लग्न होताच ती विधवा बनून माहेरी परत यायची. त्यामुळे मीनाक्षीला लग्न कधी करायचेच नव्हते. सीतामाईंना मीनाक्षीची खूप काळजी वाटायची. निघताना सीतामाई मीनाक्षीला अश्व शाळेत काम करणाऱया किरणला भेटून यायला सांगते. मीनाक्षीला कळत नाही की किरणला का भेटायचं, पण सीतामाईंना माहीत असतं की किरणला मीनाक्षी खूप पसंत आहे. पण या जन्मी घराण्याच्या शापामुळे मीनाक्षीचं लग्न होऊ शकत नाही. पण सीतामाईंना खात्री असते की पुढल्या कुठल्या तरी जन्मी हे दोघं एकत्र येतीलच आणि हे खरं होतंही.
आता सीतामाईचा अयोध्यामध्ये प्रवेशाबद्दल बोलूया. अयोध्यामध्ये जोरदार स्वागत होतं. कौशल्या मातेने तर मिथिलेत दूत पाठवून सीतेला काय आवडतं, काय नाही याची चौकशी करून ठेवलेली असते. राम तर सगळय़ांचा आवडता म्हणजे घरच्यांचा आणि प्रजेचादेखील. म्हणून सीतामाईबद्दल सगळय़ांना उत्सुकता होती. भव्य आणि दिव्य स्वागत चारही राजकुमार आणि त्यांच्या पत्नींचं होतं. मिथिलेतील चारही राजकन्या आणि त्यांच्या दासी अयोध्यामध्ये आल्यावर जरा भांबवून जातात. मिथिलेत खूप साधेपणा आणि अयोध्येमध्ये खूप श्रीमंती व दिखाऊपणा.
भव्यदिव्य राजवाडा, त्यातील अति श्रीमंती. कोणालाही भेटायला जायच्या आधी दासीमार्फत वर्दी द्यायची. हे सर्व मिथिलेपेक्षा खूप वेगळं होतं. शिवाय राण्यांमधील एकमेकींच्या नात्यात प्रेम कमी आणि स्पर्धाच जास्त पाहायला मिळत होती. सीतामाई घराण्याच्या चालीरीती समजून घेतात. सगळय़ा सासवांची मनापासून सेवा करतात. प्रत्येकाची आवड-निवड जाणून घेतात. त्याप्रमाणे त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून प्रत्येकाला खूश करतात. बहिणींना आणि त्यांच्याबरोबर आलेल्या दासींना मिथिलेची आठवण आली तर त्या त्यांना जवळ घेऊन त्यांची समजूत काढतात. आपण इथे खूप जबाबदारीने वागलं पाहिजे जेणेकरून आपल्या माहेरची शान कमी होता कामा नये असं सीतामाई त्या दासींना समजावून सांगायच्या. रामजी आणि सीतामाईमधील प्रेम तर असं काही विलक्षण असतं की त्यांच्या संपर्कात येणारे प्रत्येकजण हे प्रेम बघून आनंदित होतात. त्यांच्यामध्ये फुललेले प्रेमाचे फूल इतके सुगंधित होते की, त्यात संपूर्ण अयोध्या सुगंधित होऊन जाते. रामजी आणि सीतामाईंना एकमेकांविषयी आदर व विश्वास होता. त्यांच्यात मनमोकळा संवाद होईल अशी मैत्री होती. मुख्य म्हणजे प्रत्येक सुखदुःखात एकमेकांना साथ व प्रसंगी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी होती. यालाच प्रेम म्हणतात ना. त्यांचे मनाचे धागे इतके जुळले होते की काही न सांगता त्यांना एकमेकांच्या मनातील प्रत्येक गोष्ट कळायची. प्रेम म्हणजे आंतरिक ओढ. हे केवळ एक स्त्राr व पुरुष यातील प्रेम नव्हते तर दोन आत्म्यांचे मिलन होते. जे अभिन्न होते. यातच एक वर्ष निघून गेलं.
अयोध्येमध्ये स्त्रियांना राजवाडय़ाबाहेर मनात येईल तेव्हा जायची मुभा नव्हती. सीतामाई तर लहानपणापासून जंगलात, नदीवर, बागेत, नगरात, शेतात एकटय़ा जायच्या. इथे अयोध्येमध्ये राजवाडय़ात सीतामाईंना निसर्गाची खूप आठवण यायची. एकदा त्यांनी मीनाक्षीकडून सेविकेचा पोशाख मागून घेतला आणि त्या सोमा आणि मीनाक्षीबरोबर शरयू तीरावर गेल्या. त्यांनी शरयू नदीच्या दिव्य आत्म्याची पूजा केली तेव्हा शरयू नदी स्वत येऊन सीतामाईंना भेटल्या. तेव्हापासून सोमा आणि मीनाक्षीसाठी ती शरयू नदीची जागा खूपच पवित्र ठरली. पुढे हीच जागा समस्त अयोध्येतील महिलांसाठी पवित्र पूजा स्थान बनली.
दशरथ महाराज रामाचा राज्याभिषेक ठरवतात. या पुढची गोष्ट तर आपल्याला माहीतच आहे. रामाला 14 वर्षांचा वनवास माता कैकयीमुळे होतो. कौसल्या माता सीतामाईंना रामजीबरोबर जायची परवानगी देतात. कारण त्यांना माहीत असतं की हे दोघे एकमेकांशिवाय परिपूर्ण नाहीत. मीनाक्षी विचारते की, ‘आमचं काय? आम्ही पण तुमच्याबरोबर येतो.’ तेव्हा सीतामाई म्हणतात, ‘मीनाक्षी हे शक्य नाही. आज जरी तुम्हाला हे कैकयी माता व मंथरा हे कारण वाटत असलं तरी आम्ही जंगलात जाणं हे विधिलिखित आहे, जे खूप गरजेचं आहे. जंगलातील आश्रमावर होणारे हल्ले थांबवले नाहीत तर पुढच्या पिढीपर्यंत ज्ञान कसं जाईल?’
त्या काळातील आश्रम म्हणजे आजच्या काळातील शैक्षणिक संस्था. या आश्रमाचं संरक्षण होणं ही काळाची गरज होती. मीनाक्षी विचारते, ‘सीतामाई तुमच्याशिवाय आम्ही चौघी इथे राहून काय करू?’ सीतामाई चौघींना बोलवते आणि त्यांना एक कलश देते. त्या कलशामध्ये स्वतमधून चिदाग्नी काढून ठेवते. कलशामध्ये अग्नी प्रकट होतो. नंतर प्रत्येकीला एक एक मंत्र देते आणि सांगते रोज सकाळ-संध्याकाळ या मंत्राचा पाठ या कलशासमोर करा. तुमच्या माझ्यातील संपर्क या कलशातील अग्नीद्वारे कायम राहील. नंतर ती चौघींना कौसल्या माता, सुमित्रा माता आणि कैकयी माता यांची सेवा करायला सांगते.
मीनाक्षी रागावते, मी कैकयी मातेची सेवा का करू? सीतामाई तिला समजावून सांगतात की, ‘आज कैकयी मातेला माहीत नाही की त्यांनी काय केलं आहे, पण उद्या जेव्हा त्यांना त्याची जाणीव होईल तेव्हा कोणी त्यांच्याबरोबर नसेल. तिला तेव्हा आधाराची गरज असेल. तू तेव्हा तिचा आधार हो. बघा किती प्रेम आहे सीतामाईच्या मनात. अशाच प्रेमळ सीतामाईंना नमस्कार करून आजचा भाग संपवते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List