महायुती सरकारने मुंबईचे पाणी रोखले! मुंबईवर पाणीटंचाईचे सावट; राखीव कोट्याची मागणी तीन आठवडे पडून
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावांतील पाणीसाठा एप्रिलच्या सुरुवातीलाच थेट 33 टक्क्यांवर गेल्याने पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. यातच राज्य सरकारच्या अखत्यारीतील वैतरणा आणि भातसामधून राखीव कोट्यातील जलसाठा देण्यासाठी पालिकेने केलेली मागणी तीन आठवडे उलटूनही सरकार दरबारी पडून आहे. त्यामुळे मुंबईत लवकरच पाणीकपात लागू होण्याची भीती निर्माण झाली आहे.
मुंबईला मोडक सागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा प्रकल्पातून दररोज 3850 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो, मात्र गेल्या काही वर्षांपासून मुंबईचे वाढलेले औद्योगिकीकरण आणि नागरीकरणामुळे दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढत आहे. शिवाय क्लायमेंट चेंजमुळे पाऊस लांबत असल्याने मुंबईत गेल्या वर्षापासून 10 ते 20 टक्क्यांपर्यंत पाणीकपात करण्याची नामुष्की पालिकेवर येत आहे. त्यामुळे पालिकेकडून राज्य सरकारकडे राखीव कोट्याची मागणी केली जात आहे.
लांबणाऱ्या पावसाचाही फटका
गेल्या काही वर्षांपासून पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात जूनमध्ये हजेरी लावून जाणारा पाऊस दडी मारत असतो. त्यामुळे धरणे तळ गाठतात. त्यामुळे किमान जुलैपासून सरासरी पाऊस पडला तरच पाणीकपातीचे संकट टळण्याची आशा असते.
मुंबईला सद्यस्थितीत सातही धरणांमध्ये 491440 दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. दररोजचा पाणी-पुरवठा पाहता हे पाणी ऑगस्टपर्यंत पुरणार असल्याचे दिसत असले तरी वाढणाऱ्या उन्हामुळे धरणांतील पाणी झपाट्याने कमी होत आहे.
असा आहे सध्याचा पाणीसाठा
- अप्पर वैतरणा 92035 दशलक्ष लिटर
- मोडक सागर 30260 दशलक्ष लिटर
- तानसा 38660 दशलक्ष लिटर
- मध्य वैतरणा 75585 दशलक्ष लिटर
- भातसा 238959 दशलक्ष लिटर
- विहार 12390 दशलक्ष लिटर
- तुळशी 3550 दशलक्ष लिटर
गेल्या तीन वर्षांतील 5 एप्रिलचा जलसाठा
- 2025 491440 दशलक्ष लिटर 33.95 टक्के
- 2024 413828 दशलक्ष लिटर 28.59 टक्के
- 2023 500850 दशलक्ष लिटर 34.60 टक्के
असे मिळणार वाढीव पाणी
राज्य सरकारच्या अखत्यारीमधील वैतरणामधून 68 हजार दशलक्ष लिटर आणि भातसामधून 1 लाख 13 हजार दशलक्ष लिटर असा राखीव पाण्याचा कोटा पालिकेला मिळाल्यास मुंबईत पाणीकपातीची गरज लागणार नाही. यासाठी पालिकेच्या जलविभागाकडून पालिका आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. आयुक्तांच्या मंजुरीनंतर तीन आठवड्यांपूर्वी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List