दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात संताप, पुणेकरांची उग्र निदर्शने; चिल्लर फेकली
तनिषा भिसे या गर्भवतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात आज संतापाची लाट उसळली. नामफलकाला काळे फासत प्रशासकांवर चिल्लर फेकून पुणेकरांनी हिसका दाखवला. दरम्यान, मृत्यूप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
शिवसेना पक्षातर्फे रुग्णालयाबाहेर जोरदार आंदोलन केले. शहरप्रमुख गजानन थरकुडे, ओंकार मारणे, वैभव दिघे, प्रसाद खुडे, दीपक शेडगे, आकाश झांजले, रेखा कोंडे, गणेश घोलप, परेश खांडके यावेळी उपस्थित होते. शहरप्रमुख गजानन थरकुडे म्हणाले, ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गरीब रुग्णांच्या उपचारांसाठी या रुग्णालयाला जागा उपलब्ध करून दिली. मात्र, त्याचा आता दुरुपयोग केला जात आहे. या ठिकाणी पैशांसाठी रुग्णांचा जीव घेतला जात आहे. त्यामुळे धर्मादाय आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी,’ अशी मागणी त्यांनी केली.
युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर शाई फेकून आणि रुग्णालयाच्या नामफलकाची फाडाफाड करून निषेध नोंदविला. पतित पावन संघटना, बहुजन भीमसेना संघटना अशा विविध पक्ष-संघटनांतर्फे रुग्णालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.
10 लाख डिपॉझिट भरण्यास सांगितल्याची रिसिटच समोर
क्रिटिकल शस्त्रक्रिया असल्यामुळे रुग्णालय प्रशासनाने तत्काळ 10 लाख रुपये डिपॉझिट भरण्यास सांगितले. ‘आम्ही अडीच लाख रुपये आता भरतो आणि उर्वरित पैसे लगेच भरले जातील, अशी विनंती करूनही रुग्णालय प्रशासन ऐकायला तयार नव्हते,’ असा आरोप मृत गर्भवती महिलेच्या नातेवाईकांनी केला होता. यावर अर्धवट माहिती देऊन दिशाभूल करीत असल्याचे रुग्णालयाने म्हटले होते. परंतु आता 10 लाख डिपॉझिट भरण्यास सांगितल्याची रिसिटच समोरही आली आहे.
डॉ. घैसास यांच्या रुग्णालयाची तोडफोड
डॉ. सुश्रुत घैसास यांच्या कर्वेनगरमधील खासगी आश्विनी हॉस्पिटलमध्ये घुसून तोडफोड करण्यात आली. संबंधित गर्भवती ही डॉ. सुश्रुत घैसास यांच्याकडे तपासणीसाठी गेली होती. डॉ. घैसास हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात कार्यरत आहेत. त्यांच्या वडिलांचे कर्वेनगर भागात ‘आश्विनी हॉस्पिटल’ नावाने खासगी रुग्णालय आहे. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेरील कुंड्या फेकून, तोडफोड करत निषेध केला. दरम्यान, डॉ. सुश्रुत घैसास यांचा या रुग्णालयाशी काहीही संबंध नाही, असा दावा डॉ. घैसास यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List