कोणी घर देता का घर ? मुंबईकराचं स्वप्नं कधी होणार पूर्ण ? घर महागणार, रेडीरेकनर दरांमध्ये वाढ
मुंबई हे स्वप्नांचं शहर म्हणून ओळखलं जातं, आणि याच शहरात आपलं एक तरी घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. करोडो लोक मुंबईत पोटापाण्यासाठी येतात, राहतात, पण प्रत्येकालाच काही स्वत:च्या मालकीचं घर घेता येत नाही, तेवढी किंमत सर्वांनाच परवडणारी नसते. आणि आता मुंबईत घर घेण्याचं हे स्वप्न आणखीनच महागणार आहे. त्याचं कारण म्हणते रेडीरेकनर दरांमध्ये झालेली वाढ. राज्यातील रेडीरेकनर दरामध्ये सरकारडकडून वाढ करण्यात आली आहे. मुंबईत 3.39 टक्के, ठाण्यात 7.72 टक्के तर सोलापूरमध्ये सर्वाधिक, म्हणजे 10.17 टक्के वाढ करण्यात आली आहे.
आजपासूनच लागू होणार नवे दर
राज्यात सरासरी 4.39 टक्के रेडीरेकनर दरांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे संपूर्ण राज्यात घरांच्या किंमती वाढणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे नवे दर आज, मंगळवारपासून लागू होतील. त्यामुळे घरे महागणार आहेत. राज्याच्या नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक विभागाने 2025-26 कालावधीसाठी रेडीरेकनर दरांमध्ये वाढ जाहीर केली आहे. त्यानुसार मीरा-भाईंदरमध्ये 6.26 टक्के, कल्याण- डोंबिवलीत 5.84 टक्के, नवी मुंबईत 6.75 टक्के अशी वाढ जाहीर करण्यात आली आहे. या वाढीमुळे आता मुंबईसह संपूर्ण राज्यात घरांच्या किंमतीमध्ये वाढ होणार असून घर खरेदीची करणाऱ्या नागरिकांवर अधिक आर्थिक भार पडणार आहे.
कशी असेल वाढ ?
महापालिका क्षेत्र – 5.95. टक्के (मंबई वगळता)
राज्याची सरासरी वाढ – 4.39 टक्के (मुंबई वगळता)
मुंबई महापालिका क्षेत्र सरासरी वाढ – 3.39 टक्के
संपूर्ण राज्याची एकूण वाढ -3.89 टक्के
ग्रामीण क्षेत्र – 3.36 टक्के
प्रभाव क्षेत्र – 3.29 टक्के
नगरपरिषद/पंचायत क्षेत्र – 4.97क्के
2022-23 मध्ये रेडीरेकनर दरात वाढ करण्यात आली होती. राज्याच्या महसुलात बांधकाम क्षेत्रातून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाचा मोठा वाटा आहे. यामुळे आता दोन वर्षांनी पुन्हा दरवाढ करण्यात आली आहे. याआधीच मुंबईसह महानगरात घरांच्या किंमती गगनाला भिडल्या असताना नव्या रेडीरेकनर दरांमुळे त्यात आणखी भर पडणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List