मुंबईत भीषण अपघात, कार एकमेकांवर आदळल्या; दोघांचा मृत्यू
मुंबईतील दादर परिसरात दोन कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात टॅक्सी चालकासह एका महिलेचा मृत्यू झाला आहे. दादरच्या सेनापती बापट मार्गावर हा अपघात झाला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे
नेमकं काय घडलं?
आज शनिवारी (२९ मार्च) दुपारी १२ च्या सुमारास लोअर परळच्या सेनापती बापट मार्गावरील एलफिन्स्टन पुलावर भीषण अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार एका भरधाव एसयूव्ही कारने समोरुन टॅक्सीला धडक दिली. ही धडक इदतकी भीषण होते की यात टॅक्सीचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातामुळे टॅक्सीतील दोन जणांचा मृत्यू झाला. या अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र या अपघातामुळे मुंबईकरांना धक्का बसला आहे.
लोअर परळच्या एलफिन्स्टन पुलावर दुभाजक नाही. तसेच या परिसरात अनेक मोठमोठ्या कंपन्या आहेत. यामुळे या ठिकाणच्या वाहनांची संख्या ही खूप जास्त आहे. तसेच या वाहनांचा वेगही जास्त असतो. लाखो कर्मचारी या पुलाचा वापर करत असतात. पण आज शनिवार असल्याने नेहमीपेक्षा कमी वर्दळ होती. तसेच रस्ताही मोकळा होता. या मोकळ्या रस्त्यावरुन वेगाने आलेल्या कार आणि टॅक्सीची धडक झाली. त्यामुळे हा अपघात झाला. या अपघाताचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.
कोकणात तीन अपघात
तर दुसरीकडे कोकणात तीन ठिकाणी अपघात झाले. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून, 35 जण जखमी झाले आहेत. अलिबाग बायपास जवळ असेलल्या चर्चजवळ भीषण अपघात झाला. यात मोटारसायकल आणि स्कुटीच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच मुंबई गोवा महामार्गावरील पीरलोटे भागातील हॉटेल विरंगुळा येथे भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक दिली. गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कार ने दुचाकीला धडक देत मुंबईकडे जाणाऱ्या बोलेरो पीक अप गाडीवर आदळली. अपघातामध्ये दुचाकीस्वार थोडक्यात बचावला. यात तीन गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
सिंधुदुर्गातील कुडाळ येथून पणजीकडे जाणाऱ्या एसटी बसला इन्सुली घाटीत अपघात झाला आहे. या अपघातात गाडीतील 35 प्रवासी जखमी झाले. त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यात काही महिलांसह लहान मुलांचाही समावेश आहे. अनेक प्रवाशांच्या हाताला डोक्याला पायाला अशी दुखापत झाली आहे. एसटी चालकाच्या छातीला तर वाहकाच्या डोक्याला दुखापत झाली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List