दिशा सालियन प्रकरणात अनिल देशमुख यांचा मोठा दावा, म्हणाले मी गृहमंत्री असताना…
दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दिशा सालियन प्रकरणात याचिका दाखल केल्यामुळे पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलं आहे. या याचिकेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप करण्यात आले आहेत. यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं असून, आरोप -प्रत्यारोपाला उधाण आलं आहे. या प्रकरणावर बोलताना आता माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी मोठा आरोप केला आहे.
नेमकं काय म्हणाले देशमुख?
दिशा सालियन प्रकरणात मालवणी पोलिसांनी कालच क्लोजर रिपोर्ट दिला आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्याचं राजकीय षडयंत्र सुरू असल्याचं दिसून येत आहे, मी गृहमंत्री असल्यापासून सांगत आहे, की हे एक षडयंत्र आहे, आणि हेच सत्य आहे, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
दिशा सालियन प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपाला उधाण
दिशा सालियन प्रकरणात तिचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप करण्यात येत आहेत. यावरून महायुतीच्या नेत्यांकडून आदित्य ठाकरे यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. मात्र दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून हे आरोप फेटाळले जात आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली होती.
या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी काही गौप्यस्फोट केला होता. दिशा सालियनच्या वडिलांवर त्यावेळी दबाव होता. या प्रकरणात उद्धव ठाकरे यांचे मला दोन फोन आले असा दावा राणे यांनी केला होता. मात्र दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून हा दावा फेटाळण्यात आला, उद्धव ठाकरे यांनी कोणताही फोन केला नव्हता, उलट राणे यांना जेव्हा अटक झाली, तेव्हा उद्धव ठाकरे यांना फोन करण्यात आला होता, असं राऊत यांनी म्हटलं आहे. याच प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांनी देखील राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यामुळे आता राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List