शिवनेरी चालवताना मोबाईलवर मॅच पाहणाऱ्या चालकाची नोकरी गेली, आता टॅक्सी-रिक्षाचालकही रडारवर
एसटी चालवताना चालकांना मोबाईलवर बोलणे किंवा मोबाईल पाहण्यास बंदी असतानाही एका चालकाला ही चुक महागात चांगलीच महागाच पडली आहे. एका दादर ते स्वारगेट पुणे करीता निघालेल्या ई- शिवनेरीत चालक शनिवारी, २२ मार्च रोजी मोबाईलवर आयपीएलची मॅच पाहात बस चालवित असल्याची व्हिडीओ चित्रफित व्हायरल झाल्यानंतर एसटी महामंडळाने ही कारवाई केली आहे.
दादर ते पुणे मार्गावर शिवनेरी बस चालवत असताना मोबाईलवर क्रिकेट मॅच पाहणाऱ्या एका खाजगी चालकाला व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता एसटी प्रशासनाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशानुसार संबंघित चालकाला सेवेतून बडतर्फ केले आहे आणि संबंधित खाजगी कंपनीला ₹ ५०००/- इतका दंड ठोठावला आहे.
२२ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता दादर येथून स्वारगेट (पुणे) साठी निघालेल्या खाजगी ई-शिवनेरी बसमधील चालक रात्री लोणावळा जवळ बस चालवत क्रिकेट मॅच पाहत असलेले चित्रीकरण संबंधित बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवले. याबाबत परिवहन मंत्री सरनाईक यांनी तातडीने एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
खाजगी चालकांना प्रशिक्षण द्यावे
ई-शिवनेरी ही एसटीची मुंबई -पुणे मार्गावरील प्रतिष्ठित बस सेवा आहे. या एसटीच्या शिवनेरी बसमधून मुंबई आणि पुणेकर निर्धास्त प्रवास करीत असतात. “अपघातविरहित सेवा ” हा या बस सेवेचा नावलौकिक आहे. त्यामुळे अशा प्रकारे बेशिस्त वाहन चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याचे मंत्री सरनाईक यांनी म्हटले आहे. एसटीकडे असलेल्या खाजगी बसच्या चालकांना संबंधित संस्थेकडून वेळोवेळी शिस्तबद्ध वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
रिक्षा टॅक्सी आणि खाजगी चालकही रडारवर
काही रिक्षा, टॅक्सीचे चालक आणि खाजगी बस चालक देखील कानात हेडफोन घालून गाडी चालवत असतात. तसेच मोबाईलवर मॅच अथवा चित्रपट पाहत असल्याच्या तक्रारी प्रवासी वर्गाकडून येत आहेत. या संदर्भात लवकरच परिवहन विभागाकडून नवीन नियमावली निश्चित करून अशा चालकांच्यावर निर्बंध आणले जाणार आहेत.
– परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List