लग्न केले म्हणजे पत्नीचे मालक होत नाही, अश्लील व्हिडीओ पोस्ट केल्यावरून अलाहाबाद हायकोर्टाचे ताशेरे
पत्नीचा अश्लील व्हिडीओ बनवून तो फेसबुकवर पोस्ट केल्यावरून अलाहाबाद उच्च न्यायालयाने पतीवर ताशेरे ओढले. एकदा लग्न झाले म्हणजे तुम्ही तुमच्या पत्नीचे मालक होत नाही. तसेच लग्नामुळे पत्नीची स्वायत्तता किंवा गोपनीयतेचा अधिकार कमी होत नाही, असे बजावत आरोपपत्र रद्द करण्याची पतीची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. पत्नीने पतीवर ठेवलेल्या विश्वासाचा आदर करणे अपेक्षित असल्याचे न्यायमूर्ती विनोद दिवाकर यांनी स्पष्ट केले.
आरोपपत्र रद्द करण्यासाठी दाखल करण्यात आलेला अर्ज फेटाळताना पत्नीचे फोटो अपलोड करून पतीने वैवाहिक नात्याच्या पावित्र्याचे उल्लंघन केले असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. अशाप्रकारची सामग्री अपलोड केल्यामुळे गोपनीयतेचे उल्लंघन होते. यामुळे विश्वास भंग होतो आणि वैवाहिक नातेसंबंधात कटुता येऊ शकते. पत्नीलाही स्वतःचे हक्क, इच्छा आणि अधिकार आहेत. तिच्या शारीरिक स्वायत्ततेचा आणि गोपनीयतेचा आदर करणे हे केवळ कायदेशीर बंधन नसून, नातेसंबंध जोपासण्यासाठी हे अत्यावश्यक आहे, असेही न्यायालयाने म्हटले.
अश्लील व्हिडीओ गावकऱ्यांना पाठवला याप्रकरणी पीडित महिलेने पती पद्युम्न यादव याच्या विरोधात आयटी कायद्याच्या कलम 67 अन्वये गुन्हा दाखल केला. पतीने तिच्या नकळत संमतीशिवाय त्याच्या मोबाईलवरून त्यांच्यात झालेल्या शारीरिक संबंधांचा व्हिडीओ बनवला. हा व्हिडीओ आधी फेसबुकवर अपलोड केला. त्यानंतर पत्नीचा चुलत भाऊ आणि इतर सहकारी गावकऱ्यांना पाठवला, असे पीडितेने तक्रारीत म्हटले.
पत्नी असली तरी ‘तो’ अधिकार नाही
अर्जदाराच्या वकिलाने आपली बाजू मांडताना सांगितले की, अर्जदार हा तक्रारकर्तीचा कायदेशीर विवाहित पती आहे. त्यामुळे आयटी कायद्याच्या कलम 67 अंतर्गत इथे कोणताही गुन्हा घडत नाही. तसेच पती-पत्नीमध्ये तडजोडीला खूप वाव आहे. दरम्यान, तक्रारदार महिला याचिकाकर्त्याची पत्नी जरी असली तरी त्याला पत्नीचा अश्लील व्हिडीओ बनवण्याचा आणि तो व्हायरल करण्याचा कोणताही अधिकार नाही, असे अतिरिक्त सरकारी वकिलांनी याचिकेला विरोध करत स्पष्ट केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List