Summer Eye Care Tips – उन्हाच्या तीव्रतेत डोळ्यांची घ्या विशेष काळजी
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागल्याने नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्या उद्भवू लागल्या आहेत. त्यातच पुणे शहरात सध्या डोळ्यांशी निगडित विकारांची साथ आली असून, डोळे लाल होणे, डोळ्यांतून सतत पाणी येणे यासह अन्य समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे उन्हाळ्याच्या काळात नागरिकांनी डोळ्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला नेत्रतज्ज्ञांनी दिला आहे.
पुणे शहरासह आसपासच्या परिसरातदेखील कमाल तापमानाने चाळीश अंशांचा टप्पा गाठला आहे. उन्हातील तीव्र झळा, धूळ यामध्ये सतत प्रवास केल्याने अॅलर्जीसह मोतीबिंदू, काचबिंदू, पडदा कमजोर होणे यासारख्या समस्याही उद्भवण्याची शक्यता असते.
वाढत्या उन्हात फिरताना नागरिकांना डोळ्याविषयीच्या अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत. उन्हाच्या तीव्र झळा, वाढलेले प्रदूषण, धूळ-माती डोळ्यांत गेल्याने डोळे लाल होणे, डोळ्यांतून पाणी येणे, डोळ्यांना खाज सुटणे यासह अन्य समस्यांनी डोके वर काढले आहे. पुण्यामध्ये डोळ्यांच्या समस्यांनी ग्रासलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे, अशी माहिती नेत्रतज्ज्ञ डॉ. स्नेहा वडेलकर यांनी दिली.
काय होतोय त्रास?
दुपारी उन्हाच्या तीव्र झळांमध्ये प्रवास केल्याने त्याचा त्रास डोळ्यांना होत असून, डोळे अधिक प्रमाणात लाल होत आहेत. त्यामुळे डोळ्यांतून सतत पाणी वाहत असून, डोळ्यांना खाज सुटत आहे. तसेच, प्रवासातून घरी परतल्यावर डोळ्यांची चरचर होण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरात सध्या प्रदूषणाबरोबर सुरू असलेल्या उत्खननामुळे धूळ-मातीचे प्रमाणदेखील वाढले आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान सतत धूळ-माती डोळ्यांत गेल्यानेदेखील डोळ्यांना विविध संसर्गांनी ग्रासले आहे, असे डॉ. वडेलकर यांनी सांगितले.
काय घ्याल काळजी?
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नागरिकांनी डोळ्यांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. प्रवासादरम्यान प्रत्येकाने ‘पोलराईज’ गॉगलचा वापर केलाच पाहिजे. तसेच प्रवासातून घरी परतल्यानंतर गार पाण्याने डोळे स्वच्छ धुवावे. तसेच, तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने डोळ्यांत टाकण्यासाठी ड्रॉपचा वापर करावा. डोळ्यांच्या समस्या उद्भवल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही डॉ. वडेलकर यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List