Sanjay Raut भाजपचे लोकं मृतांनाही सोडत नाही, त्याचंही राजकारण करतात; संजय राऊत यांचे टीकास्त्र
देशात औरंगजेबाच्या कबरीचं जसं राजकारण सुरू आहे तसं मृतांचं राजकारण सुरू आहे, भाजपचे लोकं मृतांनाही सोडत नाही, त्याचंही राजकारण करतात, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपुतने आत्महत्याच केली होती, असा क्लोजर रिपोर्ट सीबीआयने मुंबईतील विशेष न्यायालयात सादर केला आहे. सुशांत सिंह राजपूत व दिशा सालियान या दोघांच्या आत्महत्येवरून भाजप व सत्ताधाऱ्यांनी राजकारण केलं. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली.
”या दोन्ही आत्महत्या आहेत. पण आपल्या विरोधकांचं विशेषत: ठाकरे कुटुंबियांच्या बदनामीचा कट रचण्यासाठी या दोन्ही आत्महत्यांना कधी हत्या आहे, कधी अमुक तमूक आहे असा रंग दिला. पाच वर्षांनी दिशाच्या वडिलांना पुढे केलं व याचा तपास पुन्हा करावा यासाठी याचिका दाखल केली. देशात औरंगजेबाच्या कबरीचं जसं राजकारण सुरू आहे तसं मृतांचं राजकारण सुरू आहे, भाजपचे लोकं मृतांनाही सोडत नाही, त्याचंही राजकारण करतात. चांगल्या घरातील लोकं मरण पावली अशा वेळी त्यांच्यावर चिखल फेकून त्यांना बदनाम करण्याचं राजकारण भाजपने सुरू केलं आहे. सगळ्यांना त्रास होतोय, झालेला आहे. पण भाजपचा हेतू काही सफल होत नाही. आमच्या सारखी लोकं, ठाकरे परिवारासारखी लोकं, अनिल परबांसारखी लोकं ठामपणे खंबीरपणे उभी आहेत”, असे संजय राऊत म्हणाले.
नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या दाव्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ”मी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. उद्धव ठाकरे यांनी याचा पूर्णपणे इनकार केला आहे. असा कोणताही फोन त्यांनी नारायण राणे यांना केलेला नाही. मिलिंद नार्वेकर देखील म्हणाले की मी कुणाला फोन लावून दिलेला नाही. नारायण राणे यांनी कशाच्या आधारे इतक्या वर्षाने वक्तव्य केलं आहे ते पाहावं लागेल. नारायण राणे यांना जेव्हा अटक झाली होती तेव्हा त्यांच्या कुटुंबातून फोन आले होते उद्धव ठाकरेंना. जरा सांभाळून घ्या, त्यांची प्रकृती बरी नाही. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना सूचना देऊन सुटका करायला लावली होती. अमित शहा यांचा देखील उद्धव ठाकरे यांना फोन आला होता आमचे केंद्रीय मंत्री आहेत जरा सांभाळा असं सांगायला. व्यक्तिगत चर्चा सुद्धा खोटा मुलामा देऊन बाहेर काढल्या जात आहेत. महाराष्ट्रात असे वातावरण कधीच नव्हतं. राजकीय विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये संवाद कायम होता. कोणतीही कारवाई कुटुंबापर्यंत जात नव्हती. अमित शहा व नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून देशात घाणेरडं दळभद्री राजकारण सुरू झालं आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List