‘यापुढे स्त्री पात्र करणार नाही’; सागर कारंडेच्या निर्णयाने चाहत्यांना बसला धक्का!
‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमातून आणि विविध नाटकांमधून अभिनेता सागर कारंडेनं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. ‘चला हवा येऊ द्या’मध्ये डॉ. निलेश साबळेंसोबत कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, सागर कारंडे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे अशी तगडी स्टारकास्ट पहायला मिळाली. या कार्यक्रमात सागर अनेकदा स्त्री वेशात प्रेक्षकांसमोर यायचा आणि आपल्या अभिनयाने, विनोदाच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांना पोट धरून हसवायचा. मात्र याच स्त्री पात्रांविषयी सागरने आता मोठा निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याने एक पोस्ट लिहिली असून सध्या चाहत्यांमध्ये त्याच्या याच पोस्टची चर्चा सुरू आहे.
‘यापुढे स्त्री पात्र करणार नाही’, अशी पोस्ट सागरने इन्स्टाग्रामवर लिहिली आहे. ही पोस्ट वाचून नेटकऱ्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. काहींनी त्याच्या या निर्णयाचं स्वागत केलंय, तर काहींनी त्यावर सवाल उपस्थित केला आहे. ‘काय विषय भाऊ.. कोणी छेड काढली तुमची? सांगा फक्त आताच, निकाल लावू त्याचा’, असं एकाने लिहिलं. तर ‘ये गलत बात है. श्रेया बुगडेपेक्षाही छान स्त्री सागर भाऊ तुम्ही करता. त्यामुळे ते करत राहा’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘काय विनोद करता राव, तुमच्या कित्येक स्त्री पात्रांनी आम्हाला हसवलंय’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.
सागरने अचानक असा निर्णय का घेतला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यावर अद्याप त्याची कोणती प्रतिक्रिया समोर आली नाही. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात सागरने केवळ स्त्री पात्र साकारून प्रेक्षकांना खळखळून हसवलं नाही तर त्याच्या पोस्टमन काका या व्यक्तीरेखेनं अनेकांच्या डोळ्यात पाणीसुद्धा आणलं. सेटवर पोस्टमन काका बनून सागर पत्र वाचायचा तेव्हा अनेकजण भावूक व्हायचे. मध्यंतरीच्या काळात त्याने आजारपणामुळे शोमधून माघार घेतली होती.
स्त्री पात्र साकारण्याविषयी सागर एका मुलाखतीत म्हणाला होता, “सुरुवातीला साडी नेसताना माझी खूप चिडचिड व्हायची. त्यानंतर मला या सगळ्याची सवय झाली होती. हळूहळू सगळं सहज जमायला लागलं होतं. या भूमिकांमुळे मला माझ्या बायकोचंही मनं समजू लागलं. त्यामुळे माझ्यात हा सकारात्मक बदल झाला आहे.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List