ए. आर. रेहमान यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल
ऑस्कर विजेते संगीतकार आणि गायक ए. आर. रेहमान यांना चेन्नईतील ग्रीम्स रोड इथल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यातत आलं आहे. रविवारी सकाळी त्यांना छातीत दुखू लागल्यानंतर तातडीने चेन्नईतल्या रुग्णालयात नेण्यात आलं. रविवारी सकाळी 7.30 वाजता रेहमान यांना रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या काही चाचण्या केल्या. छातीत दुखत असल्याने रेहमान यांची ईसीजी (ECG) आणि इकोकार्डिग्राम चाचणीसुद्धा करण्यात आली. ‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार रेहमान यांच्यावर एंजिओग्राम करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर हृदयाशी संबंधित विशेष डॉक्टरांकडून उपचार करण्यात येत आहे.
ए. आर. रेहमान यांच्या टीमकडून अद्याप त्यांच्या प्रकृतीविषयी कोणतीही अपडेट समोर आली नाही. मात्र त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं वृत्त सोशल मीडियावर पसरताच चाहत्यांनी काळजी व्यक्त केली. रेहमान लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
काही महिन्यांपूर्वी ए. आर. रेहमान हे त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांनी पत्नी सायरा बानू यांना घटस्फोट देत असल्याचं जाहीर केलं होतं. लग्नाच्या 29 वर्षांनंतर हे दोघं विभक्त झाले. ए. आर. रेहमान आणि सायरा बानो यांनी 12 मार्च 1995 रोजी चेन्नईत लग्न केलं होतं. त्यांना खतीजा, रहीमा आणि अमीन ही तीन मुलं आहेत. “ए. आर. रेहमान हे व्यक्ती म्हणून हिऱ्यासारखे आहेत. या जगातील ते सर्वोत्कृष्ट पुरुष आहेत. माझ्या आरोग्याच्या समस्यांमुळे मला चेन्नई सोडावं लागलं. मी युट्यूबर्स आणि तमिळ मीडियाला विनंती करते की त्यांनी त्यांच्याविरोधात काहीही वाईट बोलू नये. माझ्या आयुष्यात मी त्यांच्यावर सर्वाधिक विश्वास ठेवला. इतकं माझं त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्यांचंही माझ्यावर आहे”, असं सायरा यांनी घटस्फोटानंतर स्पष्ट केलं होतं.
ए. आर. रेहमान यांनी आतापर्यंत सहा राष्ट्रीय पुरस्कार, दोन अकॅडमी पुरस्कार आणि दोन ग्रॅमी पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. याशिवाय बाफ्ता अवॉर्ड्स, गोल्डन ग्लोब अवॉर्ड, सहा तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार, पंधरा फिल्मफेअर पुरस्कारसुद्धा त्यांना मिळाले आहेत. 2010 मध्ये त्यांना पद्मभूषण हा सन्मान प्रदान करण्यात आला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List