सरकारने आमची 100 टक्के फसवणूक केली, आता हिसका दाखवणार; मनोज जरांगे यांचा इशारा
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. सरकारने आमची 100 टक्के फसवणूक केली आहे, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता आरक्षणासाठीची लढाई ही फा.नल म२च असेल. आता त्यांना हिसका दाखवणार असून डाव कसे टाकायचे, ते आम्हालाही माहिती आहे. त्यामुळे आता फायनल होणार आणि हिसका दाखवणारच, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.
आमचा मुंबईला जाण्याचा विचार आहे. परंतु मी सध्या काही त्याबद्दल तुम्हाला सांगणार नाही. माझा डाव सांगणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले. राज्याचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला. त्यात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली नाही. सरकारचं आता भागलं आहे. त्यामुळेच लाडक्या बहिणींसाठी बजेटमध्ये काहीच दिलं नाही. उलट लाडक्या बहिणींना अपात्रतेच्या नावाखाली योजनेतून काढलं जात आहे, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.
आता डाव कसे टाकायचे? हे आम्हाला चांगले माहिती आहे. परंतु आरक्षण आम्ही घेणारच आहे. अजून थोडे थांबू, पण तयारी अशी करू की चारही बाजूंनी तुम्हाला जायला रस्ता मिळणार नाही. मुख्यमंत्र्यांनी हे लक्षात ठेवावे, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला. यापुढे कमी सांगायचे आणि कमी बोलायचे, आता करून दाखवायचे आहे. इथून पुढे सरकारची चाल खेळावी लागणार आहे. सरकार निवडून येईपर्यंत काही कळू देत नाही, बोलू देत नाही. फक्त गोड बोलते. आता अचानक आंदोलन करायचे. या भूमिकेशिवाय सरकार ठिकाणावर येणार नाही, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आरक्षणाची लढाई ही फायनल मॅच असणार आहे. तुम्ही गोड बोलून तर आमचा काटा काढला. पण आम्ही तुम्हाला खेटू आणि आरक्षण घेऊ राहू. मी गोडीत सांगतो, यापुढे आंदोलन लोकशाहीतच होणार आहे. पण मॅच फायनल असणार आहे. मी आरक्षण मागतोय म्हणजे मला विनाकारण जातीवादी ठरवू नका. तुम्ही आमच्या आरक्षणाला विरोध करत आहात, म्हणजे तुम्हीच जातीवादी आहात.आमची 100 टक्के सरकारकडून फसवणूक झालेली आहे. त्यामुळे आता त्यांना हिसका दाखवणारच, असा इशाराही त्यांनी दिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List