Womens Day 2025- स्टंटमधे झालेल्या जखमांनी मला कणखर बनवलं! शोले गर्ल रेश्मा पठाण यांची विशेष मुलाखत
>> प्रभा कुडके
बहुचर्चित शोले हा चित्रपट प्रदर्शित होऊन अंदाजे 50 वर्षांचा काळ उलटला आहे. परंतु शोले चित्रपटातील संवाद आजही रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यातीलच एक मस्तीभरा संवाद ”भाग धन्नो तुम्हारी बसंती की, इज्जत का सवाल हैं” या संवादानंतर लगेच टांग्यावरील हेमामालिनी तुमच्या डोळ्यांसमोर आली असेल ना.. टांग्यावर बसलेली प्रत्यक्षात हेमामालिनी नसून इंडस्ट्रीमधील पहिली वहिली स्टंट वूमन आहे रेश्मा पठाण…
शोले या चित्रपटासाठी हेमामालिनीकरता बाॅडी डबल म्हणून रेश्मा पठाण यांनी काम केलं होतं. मीनाकुमारी, श्रीदेवी, मीनाक्षी शेषाद्री, सायरा बानो, डिम्पल कपाडिया अशा अनेक अभिनेत्रींसाठी त्यांनी बाॅडी डबल म्हणुन काम केले आहे. ‘शोले’ चित्रपटानंतर स्टंट इंडस्ट्रीमध्ये रेश्मा यांची ओळख ‘शोले गर्ल’ अशीच झाली ती आजतागायत तशीच कायम आहे. सध्याच्या घडीला रेश्मा यांनी वयाची साठी पूर्ण केली आहे.
भेंडीबाजारमधल्या मुस्लिम कुटूंबात रेश्मा यांचा जन्म झाला. शिक्षण घ्यावं आणि काहीतरी मोठ्ठं व्हावं हे बाळकडु घरात कधीच मिळालं नाही. त्यामुळे लहानपणापासुनच मिळेल ते काम करायचं हेच फक्त शिक्षण मिळालेलं. रेश्मा यांचे वडिल रस्त्यावर छोटी खेळणी लावुन ती विकण्याचं काम करायचे. त्यामुळे त्यांच्यासोबत रेश्माला रोज जावंच लागे. रोज जाणं हे सक्तीचं असल्यामुळे शिक्षण फारसं झालंच नाही. जेमतेम सहावी पर्यंत शिक्षण…
रेश्मा यांचे वडिल ज्याठिकाणी खेळणी लावायचे तिथे बाजुलाच एक छोटसं मैदान होतं. जुन्या जमान्यातील ‘मौत का कुआ’, दिवसरात्र सायकल चालवणं असे कार्यक्रम त्या मैदानात व्हायचे. रेश्मा यांच्यासाठी हे खेळ पाहणं खुप आकर्षणाचं केंद्र असायचं.
‘मौत का कुआ’ आणि त्यातला तो बाईक चालवणारा रेश्मा यांना हिरो वाटायचा. कुआ त्यातला काळोख आणि त्या काळोखातुन बाईकचा आवाज करत वर येणारा बाईकस्वार पाहताना त्यांना खूप आनंद व्हायचा. रेश्मा जुन्या आठवणींना उजाळा देताना अगदी हरवून गेल्या होत्या. अधिक बोलताना त्या म्हणाल्या, थोडी मोठी झाल्यावर बाजुच्या एका व्यक्तीने फिल्म इंडस्ट्रीमधे एक्स्ट्राचे काम करशील का असं विचारलं. दिसायलाही बरी होते त्यामुळे मी लगेच होकार दिला. घरच्यांनी नकार द्यायचा प्रश्नच नव्हता कारण गरज ही फक्त पैसा होती.
फिल्म इंडस्ट्रीत जेमतेम तीन महिने एक्स्ट्राचे काम केल्यानंतर रेश्मा यांना शोले या चित्रपटासाठी टांगा चालवण्यासाठी विचारण्यात आले. रेश्मा यांनी तात्काळ नाही असे सांगितले कारण त्यांना टांगा चालवणे माहितच नव्हते. परंतु दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी रेश्मा यांना टांगा चालवण्यासाठी सराव करण्यास सांगितला. आठ दिवसांचा कालावधी सराव करण्यासाठी मागितला आणि मग मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही.
शोले मधील धन्नो या घोडीसोबत जवळपास दिवसातले सात तास सराव करुन रेश्मा यांचे घोडीशी चांगलेच सूर जुळले होते. हेमामालिनीसाठी बाॅडी डबल म्हणुन काम करण्यासाठी रेश्मा सज्ज झाल्या आणि काही मिनिटात सिन ओके झाला. अशाप्रकारे त्यांचा स्टंट इंडस्ट्रीमधे प्रवेश झाला. त्यानंतर सीता और गीता, बर्निंग ट्रेन, दो और दो पाच या आणि इतर अनेक चित्रपटातील हेमा मालिनीसाठी बाॅडी डबल म्हणुन काम त्यांनी केलं.
बाॅडी डबल म्हणुन काम करताना जीवाची भीती वाटली नाही का? या प्रश्नावर त्या केवळ इतकंच म्हणाल्या, ‘घरवालोंने कभी खरोच आयी तभी पुछा नही सिर्फ कमाई पुछी’! त्यामुळे रेशमा यांच्यासाठी स्टंट इंडस्ट्री हे एकमेव कमावण्याचं साधन होतं.
गेली तीस ते चाळीस वर्ष त्या स्टंट इंडस्ट्रीमधे काम करताहेत. वयाची साठी पार केलेल्या, रेश्मा यांनी नुकत्याच आलेल्या ‘गोलमाल’ चित्रपटासाठी एक स्टंट केला होता. हा सिन पाहुन बक्षीस म्हणुन रोहीत शेट्टीने स्वतः त्यांना त्याक्षणी 25 हजार हातात काढुन दिले होते. ही अगदी ताजी आठवण रेश्मा यांनी सांगितली.
सध्याच्या घडीला रेश्मा यांची मुले चांगल्या कंपनीमधे कामाला आहेत. आज ही मुलं आईला स्टंट करु नकोस असं सतत सांगत असतात परंतु रेश्मा म्हणतात, स्टंट नही करूंगी तो जिंदा रहेने के लिए करूंगी क्या… आज पैसा ही रेशमा यांची गरज नाही त्यांनी काम करुन नीट कमावलेलं आहे.
पण रेश्मा म्हणतात, मै काम इसलिए कर रही हू क्योंकी मुझे इस काम का चस्का लग गया हैं… स्टंट मधला अनुभव सांगताना त्या म्हणतात, स्टंंटमधे झालेल्या जखमांनी मला कणखर बनवलं. जखम झाल्यावर ती जपत बसण्यासाठी वेळच नव्हता. एक जखम झाली की, दुसऱ्या कामासाठी जावं लागे. त्यामुळे जखमेचे लाड करणं हे परवडणारं नव्हतं. त्यामुळे अंगी आपसुक कणखरपणा आला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List