देवाची काठी लागत नाही, न्याय मात्र मिळतो, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया, त्या खंडणी प्रकरणाविषयी मोठी मागणी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येची फोटो आणि व्हिडिओ समोर आली आहेत. त्यानंतर राज्यात लोकांच्या संतापाचा उद्रेक दिसत आहे. सर्वच समाजातून आणि स्तरातून या घटनेचा निषेध होत असतानाच आरोपींना पाठीशी घालण्याच्या प्रकाराविरोधात एकच असंतोष दिसला. या फोटोनंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली. सकाळपासून त्याविषयी विविध प्रतिक्रिया आल्या. तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारल्याचे आणि पुढील कार्यवाहीसाठी तो राज्यपालांकडे पाठवल्याचे जाहीर केले. तर हे प्रकरण धसासा लावण्याचा प्रयत्न करणारे भाजप आमदार सुरेश अण्णा धस यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
देवाची काठी लागत नाही…
संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या 9 डिसेंबर 2025 रोजी झाली होती. त्यांना अनेक तास सतत मारहाण करण्यात आली. तीन चार गावांच्या सीमा रेषांवर त्यांना मारहाण करत एका टेकडीवर नेण्यात आले आणि अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या झाली. माणसूकीला काळिमा फासणारा प्रकार आरोपींनी केला.
मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली. देवाची काठी लागत नाही, परंतु न्याय मिळतो, असे ते म्हणाले. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी ठाम भूमिका घेतली. आज तो न्याय दिसल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांच्या सावरगाव येथील सभेतील त्या वक्तव्याची आठवण करून दिली. त्यात वाल्मिक कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचे पान सुद्धा हलत नाही, अशा त्या म्हणाल्या होत्या. तोच धागा पकडून धसांनी संतोष देशमुखांच्या हत्येचं पान मुंडेशिवाय परस्पर कसं हललं? असा सवाल करत मुंडे यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उभं केले आहे.
त्या खंडणीसंदर्भात मुंडे यांच्या अडचणी वाढणार?
संतोष देशमुख यांची हत्या ही खंडणीमुळे झाली आहे. तर यापूर्वी सुद्धा आपण आरोप केल्याप्रमाणे सातपुडा बंगल्यावरती खंडणी संदर्भात बैठक झाली होती की नाही, याचं धनंजय मुंडे यांनी उत्तर द्यावं, असे आव्हान धस यांनी दिले आहे. ते मंत्री असोत वा नसोत याचे उत्तर मुंडे यांना द्यावं लागेल असे त्यांनी ठामपणे सांगितले. तर याप्रकरणी एसआयटीची मागणी ही त्यांनी केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List