या घडीची सर्वात मोठी बातमी! धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा, मुख्यमंत्र्यांकडे सोपवला राजीनामा, ‘पीए’ सागर बंगल्यावर
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर 82 दिवसानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्याची प्रत मुख्यमंत्र्याकंडे सादर करण्यात येणार आहे. त्यांचे पीए राजीनाम्याची कॉपी घेऊन सागर बंगल्यावर पोहचले आहेत. तर तातडीने मुख्यमंत्री विधानभवनाकडे निघाले होते. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला आहे, अशी घोषणा प्रसार माध्यमांसमोर दिली. आपण हा राजीनामा स्वीकारला असून तो पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवल्याचे, मुंडे यांना पदमुक्त केल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
अडीच महिन्यानंतर राजीनामा
9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. तेव्हाच विरोधकांनी ही अत्यंत क्रूर हत्या झाल्याचा आरोप केला होता. काल समाज माध्यमांवर सीआयडीच्या दोषारोपपत्रा सोबतचे फोटो समोर आले. त्यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. विरोधकांनीच नाही तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुद्धा अत्यंत जहाल प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यानंतर आज सकाळपासूनच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती. धनंजय मुंडे यांना कालच राजीनामा दिल्याचा दावा करण्यात येत होता. तर आज सकाळपासून विरोधकांनी राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.
पीएच्या मार्फत पाठवला राजीनामा
धनंजय मुंडे यांनी त्यांचा राजीनामा पीएच्या, स्वीय सहायकाच्या माध्यमातून सागर बंगल्यावर पाठवल्याची माहिती समोर येत आहे. सकाळीच पीए हा राजीनामा घेऊन सागर बंगल्यावर पोहचले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनाकडे जाण्याची लगबग सुरू होती. त्यावेळी हा राजीनामा त्यांच्यापर्यंत पोहचवण्यात आला आणि मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा स्वीकारल्याची माहिती समोर येत आहे. याविषयीची घोषणा विधानसभेत झाल्यावर त्यावर शिक्कामोर्तब होईल, असे विरोधक म्हणतात.
महायुतीचे दोन गुंडे
दरम्यान विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा यासाठी विरोधकांनी आंदोलन केले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. महायुतीचे दोनच गुंडे, कोकाटे आणि मुंडे अशा घोषणा त्यांनी केल्या. तर दुसरीकडे समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून सत्ताधारी पायऱ्यांवर आंदोलन करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List