धनंजय मुंडे राजीनामा द्या, आता सर्वोच्च आदेश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह बड्या नेत्यांची चर्चा
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरण चांगलचं तापलं असून या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो समोर आल्यानंतर आता एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी धनंजय मुंडेंना (Dhanajay Munde) तातडीने राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर वारंवार आरोप होत होते आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणीदेखील सातत्याने केली जात होती. आता फडणवीस आणि अजित पवारांनी त्यांना लाथ मारून बाहेर काढावं अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली होती. आता या हत्याप्रकरणाचे क्रूर फोटो समोर आल्यानंतर काल रात्री मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरीवर महत्वाची बैठक झाली. त्यामध्ये शेवटी राजीनामा द्यावाच लागेल, यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही धनंजय मुंडेंना राजीनामा द्या असा आदेश दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. मात्र धनंजय मुंडे हे आज राजीनामा देतात का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
घडामोडींना वेग
डिसेंबर महिन्यात संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. आरोपींनी क्रौर्याच्या सगळ्या सीमा ओलांडल्या. या प्रकरणी तपासासाठी राज्य सरकारने SIT आणि CID ची स्थापना केली होती. शनिवारी या प्रकरणात सीआयडीने 1800 पानी आरोपपत्र दाखल केलं. काल ( सोमवार) रात्री देशमुख यांच्या क्रूर, निर्घृण हत्येचे व्हिडीओ, फोटो समोर आले. विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना हे फोटो आणि व्हिडिओ बाहेर आलेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य मास्टरमाइंड वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. याआधी सुद्धा याच मुद्यावरुन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी करण्यात आली होती. पण सरकारने त्यांचा राजीनामा घेतला नाही. पण काल हे फोटो समोर आल्यानंतर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला. हे व्हिडीओ, फोटो बाहेर आल्यावर काल रात्री देवगिरी बंगल्यावर देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार झाली. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. आजचं राजीनामा द्या असं फडणवीसांनी मुंडेंना सांगितल्याचंही समोर आलं.
राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री होते आग्रही
काल या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस हे धनंजय मुंडेंशी बोलले. रात्री त्यांनी मुंडेंशी चर्चा करत, उद्या राजीनामा द्या असे त्यांना सांगितलं. तर अजित पवार यांनीही मुंडेंची कानउघडणी केल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री फडणवीस हे सुरूवातीपासूनच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते. पण धनंजय मुंडे राजीनामा देण्यास तयार नव्हते. त्यामुळे अजितदादांनी निर्णय घ्यावा असं फडणवीसांनी सांगितलं होतं. अखेर फडणवीसांनी त्यांना आज राजीनामा देण्यास सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर तरी धनंजय मुंडे आजा राजीनामा देतात का याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List