नाव शहा’पूर’… पाण्यासाठी हुरहुर, महिलांची पायपीट; विहिरीत खडखडाट
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच शहापुरात भीषण पाणीटंचाई सुरू झाली आहे. कोट्यवधी रुपयांच्या योजना आल्या आणि गेल्या. पण महिलांची हंडाभर पाण्यासाठी पायपीट सुरूच असून विहिरींमध्ये मात्र खडखडाट झाला आहे. बोअरवेल, विहिरी कोरड्याठाक पडल्या असून टँकरवरच अवलंबून राहावे लागते. फक्त घोषणा करणाऱ्या सरकारच्या हृदयाला पाझर फुटणार तरी केव्हा, असा आर्त सवाल शहापूरमधील आदिवासींनी विचारला आहे.
■ रोज टंचाईग्रस्त गाव-पाड्यांची संख्या वाढत आहे. यंदा 82 गावे आणि 262 पाडे अशा एकूण 344 गावपाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यासाठी किमान साडेचार कोटी खर्च अपेक्षित आहे.
■ आजमितीस शहापूर तालुक्यातील 15 गावपाड्यांना 12 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून नऊ गावपाड्यांनी टँकरची मागणी केली आहे.
■ पंधरा दिवसांपासून तालुक्यातील दांड, उंबरखांड, कोथळे, आटगाव, साकडबाव या गावांसह नारळवाडी, राईचीवाडी, उठावा, कोळीपाडा, सावरदेव, गोकुळनगर, पारधवाडी आदी 15 गावपाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
भावली पाणी योजना केव्हा पूर्ण होणार?
भगिनींच्या डोक्यावरील हंडा खाली उतरावा यासाठी तब्बल तीनशे कोटींची गुरुत्वाकर्षणावर आधारित भावली पाणी योजना राबवण्यात येत आहे. २०२४ अखेरपर्यंत भावली पाणी योजना पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र गोगलगायीच्या गतीने त्याचे काम सुरू आहे. ही योजना पूर्ण होणार तरी केव्हा, असा थेट सवाल ग्रामस्थांनी केला आहे
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List