पुणेकरांनो, हा भूखंड घोटाळा हलक्यात घेऊ नका…बिल्डरचे उखळ होणार पांढरे, केवळ एक रुपया चौरस फूट भाडेपट्टी
मंगळवार पेठेतील 400 कोटी रुपयांचा एमएसआरडीसी म्हणजेच रस्ते विकास महामंडळाच्या भूखंड घोटाळ्याला महायुतीतील बड्या मंत्र्याचा आशीर्वाद आहेच. परंतु या घोटाळ्याला पुणेकरांनो तुम्ही ‘हलक्यात घेऊ नका.’ सार्वजनिक बांधकाम विभागाने नाममात्र एक रुपया भाडेपट्ट्याने दिलेला हा भूखंड महामंडळाने पोटभाडे करार करून बिल्डरला वार्षिक 8 लाख 90 हजार रुपये भाडेपट्ट्याने दिला आहे. या भूखंडावर संपूर्ण बांधकाम झाल्यास बिल्डरचे उखळ पांढरे होणार असून त्यांना एक रुपया चौरस फूट वार्षिक दरानेच तो मिळणार आहे.
एकूण 8900 चौरस मीटर क्षेत्र असलेल्या या भूखंडावर काही लाख चौरस फूट बांधकाम होऊ शकेल. पुण्यामध्ये अनेक बडे मंत्री असूनदेखील त्यांना या भूखंडाच्या बाबतीत हलक्यात घेण्यात आले आहे. किंबहुना त्यांनी याकडे दुर्लक्ष का केले असावे, असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. पुणे जिल्ह्यातील मंत्रीदेखील याबाबतीत बोलण्यास तयार नाहीत. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी हा भूखंड कॅन्सर हॉस्पिटलसाठी घेण्याकरिता पुढाकार घेतला होता. परंतु ही फाईल बंद करण्यात आल्याची माहितीदेखील समोर आली आहे.
मेसर्स एन.जी. व्हेंचर्स, डेव्हर रिऑलिटी आणि माईंड स्पेस या भागीदारांनी 60 कोटी अकरा लाख रुपयांचा प्रीमियम या भाडेकरारापोटी भरला असला तरी प्रत्यक्षात पुढील साठ वर्षांसाठी त्यांना 8 लाख 90 हजार रुपये वार्षिक भाडेपट्टा या करारामध्ये मंजूर केला आहे. बांधकाम तज्ञांच्या मतानुसार या भूखंडावर किमान आठ ते नऊ लाख चौरस फूट बांधकाम होऊ शकेल. तसे झाल्यास बिल्डरला दिलेला भाडेपट्टा लक्षात घेता वार्षिक एक रुपया चौरस फूट भाडेपट्टा बिल्डरला पडणार आहे. या भूखंडावर होणाऱ्या बांधकामाच्या तळ मजल्याचा रेडिरेकनर एक लाख 16 हजार रुपये चौरस फूट, तर जमिनीचा दर 55 हजार रुपये चौरस मीटर असा आहे.
सुमारे 400 कोटी रुपयांचा हा भूखंड एवढय़ा हलक्या किमतीत देण्यामागचे गुपित पुणेकरांनी ओळखले आहे. नगर विकास खात्याने 5 ऑगस्ट 2024 रोजी दिलेले ना-हरकत प्रमाणपत्र त्यानंतर सप्टेंबर 2024मध्ये रस्ते विकास महामंडळाने केलेला पोटभाडे करार आणि पाठोपाठ 11 ऑक्टोबर 2024 रोजी फेरफार नोंदवून बिल्डरच्या नावे तयार झालेले प्रॉपर्टी कार्ड हा सरकारी कामाचा वेग बघता या बडय़ा मंत्र्याची चर्चा पुण्यात सुरू झाली आहे.
स्लीपिंग पार्टनर कोण?
मेसर्स एन.जी. व्हेंचर्स, डेव्हर रिऑलिटी आणि माईंड स्पेस या तीन कंपन्यांनी हा भूखंड भाडेपट्ट्याने घेतला असला तरी या पंपन्यांच्या आतून स्लीपिंग पार्टनर कोण? 60 कोटी अकरा लाख रुपयांचा प्रीमियम भरला गेला असला तरी प्रत्यक्षात भूखंडावर उभारण्यात येणाऱ्या बांधकामात कुणाचा पैसा गुंतवला गेला आणि मलिदा कोणाला मिळाला, याची उत्सुकता पुणेकरांमध्ये आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List