मंत्रिमंडळातून महाराष्ट्राची लूट करणाऱ्यांना मुख्यमंत्री थांबवत असतील तर त्याला विरोधी पक्षाचं समर्थन – संजय राऊत
आधीच्या सरकारने काही भ्रष्टाचार केला असेल, काही घोटाळे केले असतील, सरकारी तिजोरीवर डल्ला मारला असेल, जनतेला फसवलं असेल, राज्याला फसवलं असेल आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातला एक सच्चा आणि प्रमाणिक माणूस जागा झाला असेल आणि त्यांना या सगळ्याची चौकशी करावी, अशी तीव्र इच्छा निर्माण झाली असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवनेरीवर होते. छत्रपतींचा विचार होता, रायतेच्या काडीच्या किंवा भाजीच्या देठालाही हात लावू नका. म्हणजे एक नया पैशाचा भ्रष्टाचार करू नका आणि सहन करू नका. जर छत्रपतींच्या विचाराने वागून राज्याचे मुख्यमंत्री हे त्यांच्या मंत्रिमंडळात जे लोक आहेत ते महाराष्ट्राची लूट करताना दिसताहेत आणि त्यांना ते थांबवायचं असेल तर, आम्ही विरोधी पक्ष असलो तरी त्यांचं समर्थन करू, असे संजय राऊत पुढे म्हणाले. 900 कोटींच्या सिडकोच्या हाउसिंग प्रजोक्टची मुख्यमंत्र्यांनी चौकशी सुरू केली आहे, त्यावर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली.
“राज्य कोणाचं आहे, त्याचा फायदा कोणाला होणार आहे हे पाहून तुम्ही कामं करता”
ज्या पद्धतीने दिल्लीत सरकार स्थापन झालं आहे त्याकडे पाहायला पाहिजे. अरविंद केजरीवाल हे विरोधी पक्षात आहेत. केजरीवाल हे स्वतः पराभूत झाले असतील तरी त्यांच्या पक्षाचा आकडा हा 22 आहे. सरकार स्थापन होण्याआधीच तिथल्या नायब राज्यपालांनी यमुना सफाईची मोहीम हाती घेतली. खरं म्हणजे केरीवाल सरकार यमुना सफाईसाठी केंद्राची मदत मिळावी. पण नायब राज्यपालांनी त्यांना कोणात्याही प्रकारे यमुना सफाईचा कार्यक्रम पुढे नेऊ दिला नाही. विरोधी पक्षाचं सरकार असेल तर केंद्र सरकार कशा प्रकारे वागतं? पण सरकारने शपथ घेण्याआधी नायब राज्यपालांनी सर्व यंत्रणा आणून यमुना सफाई सुरू केली. आता यमुना सफाई सुरू केली तशी आमची मिठी नदीची सफाई का सुरू करत नाही तुम्ही? शेकडो कोटी रुपये खर्च केले. टास्क फोर्स बनवला, कोट्यवधींचा निधी आणला. मग यमुना सफाईला तुम्ही सुरुवात केली तर मिठी नदीच्या सफाईचीही सुरुवात करा. राज्य कोणाचं आहे, त्याचा फायदा कोणाला होणार आहे हे पाहून तुम्ही कामं करताय, असा जोरदार टोला संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजपला लगावला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List