निवडणुकीत मत मिळाल्यानंतर महायुती सरकारकडून लाडक्या बहिणीची फसवणूक; विजय वडेट्टीवार यांची टीका
राज्यात विधानसभा निवडणुकीआधी लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे देण्यात आले. मात्र, आता सरकार स्थापन झाल्यावर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या कमी केली जात आहे. गरज सरो आणि वैद्य मरो अशी म्हण आहे, त्याप्रमाणा महायुती सरकारने लाडक्या बहिणींची फसवणूक केल्याची टीका विधीमंडळातील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना मतं विकत घेण्यासाठी सरसकट महिलांना पैसे देण्यात आले, आता सरकार आल्यावर मात्र विविध अटी लावून लाभार्थी महिलांची संख्या कमी केली जात आहे. लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या ही 25 टक्क्यांपर्यंत आणणार ,अस महापाप सरकार करत आहे. या सरकारला या बहिणीच जागा दाखवू शकतात अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
एकनाथ शिंदे यांनी जे निर्णय घेतले त्याची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहे. हे महायुती मधील मतभेद आहेत.महायुती सरकारचा कारभार स्वच्छ असणार असा नारा मुख्यमंत्र्यांनी दिला. त्याची सुरुवात एकनाथ शिंदे यांच्या निर्णयापासून झाली आहे. महायुती सरकारमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. जनतेला मात्र वाऱ्यावर सोडले अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
या सरकारमध्ये भांडणेच जास्त आहे. शेतकऱ्यांना, महिलाना नुसती आश्वासन दिली. ही काम कधी होणार याची शाश्वती नाही पण एकमेकांशी भांडून जनतेच्या प्रश्नावरून लक्ष मात्र विचलित केलं जात आहे, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. धनंजय मुंडे यांच्यावर अंजली दमानिया यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत , दमानिया या पुराव्यानिशी बोलत आहे. त्यामुळे या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अस वडेट्टीवार म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List