शिंदेंना महादजी शिंदे पुरस्कार देणाऱ्या संस्थेची चौकशी केली पाहिजे, संमेलनाच्या नावाचा गैरवापर करून पुरस्कार दिला; संजय राऊत यांचा घणाघात
शरद पवारांशी कसलाही रुसवाफुगवा नाही. एका विषयात आम्ही आमच्या शिवसेनेच्या भावना व्यक्त केल्या. महादजी शिंदे यांच्या नावाने ज्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो त्यांनी असं कोणतं महान कार्य केलं की, ज्यांना इतके शूर योद्धा महादजी शिंदे यांच्या नावाने पुरस्कार मिळावा? असा सवाल उपस्थित करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी घणाघात केला.
महाराष्ट्र सदनमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बॅनरखाली हा कार्यक्रम घेतला गेला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने हा पुरस्कार दिलेला आहे, असा लोकांचा गैरसमज झाला. पवारसाहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याची फसवणूक झाली. हा कार्यक्रम साहित्य संमेलनाचा नव्हता तो खासगी कार्यक्रम होता. असे अनेक खासगी संस्था आपल्याकडे पुरस्कार देत असतात. पण महाराष्ट्र साहित्य परिषदेची परवानगी न घेता साहित्य संमेलनाच्या बॅनरखाली तो कार्यक्रम झाला. संमेलनाचं नाव वापरून गैरवापर करून तो पुरस्कार दिला गेला, तिथे आमचा आक्षेप आहे. असे पुरस्कार खूप मिळतात. पण पवारसाहेबांसारख्या नेत्याला अंधारात ठेवलं गेलं की, साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आहे, असे संजय राऊत म्हणाले.
“नाराजी व्यक्त करणं ही लोकशाही”
नाराजी व्यक्त करणं ही लोकशाही आहे. दोन स्वतंत्र विचारधारा आहे. आमचं एखाद्या व्यक्ती विषयीचं मत हे टोकाचं आहे. शरद पवार यांचा पक्ष फोडणाऱ्यांविषयी आमचं तेच मत आहे. माननीय शरद पवार यांचा पक्ष आणि शिवसेना पक्ष हा अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी फोडला. आणि त्यांनी या सगळ्या लोकांना हातशी धरलं. आमच्या भावना टोक्याच्या आहेत, आमच्या तीव्र भावना आहेत. शरद पवारसाहेबांचं आणि आमचं काही भांडण नाही. भांडण असण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही आमचं मत आणि आमची भूमिका मांडली. त्यांची भूमिका वेगळी असेल. आम्हाला आमची भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे, तसा त्यांनाही आहे. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल त्यांनी जे भाषण केलं ते ऐकण्यासारखं आहे, ऐतिहासिक आहे. असं काय महान कार्य केलं त्यांनी? की ते महादजी शिंदे पुरस्कार देताना जे भाषण झालं ते फार इन्ट्रेस्टिंग भाषण आहे. असं महाराष्ट्राला काय पुढे नेलं? महाराष्ट्रात पैशाचं राजकारण करणारे हे लोक आहेत. महाराष्ट्रात सत्तेचा गैरवापर करून धमक्या देऊन लोकांना फोडणारे हे लोक आहेत. दिल्ली पुढे झुकणारे हे लोक आहेत. दिल्ली पुढे सरपटणारे हे लोक आहेत. त्यांना महादजी शिंदे यांच्या नावाने कोण पुरस्कार देत असेल तर त्या संस्थेची चौकशी व्हायला पाहिजे. त्यांना इतिहास माहित आहे की नाही?
“दोन दिवस दिल्लीत थांबणार”
अनेक मराठी लोक दिल्लीत येणार आहेत. त्यांना मलाही भेटण्याची इच्छा असते. काही आमच्याशी संबंधित लोक असतात. ग्रंथ विक्रेते, पुस्तक विक्रेते, लेख असतात. त्यांना मला भेटण्याची सुद्धा इच्छा आहे. मी दिल्लीत दोन दिवस आहे. महाराष्ट्रातून आलेल्या लोकांना काही अडचणी असतील. सरकार सर्वत्र पुरे पडू शकत नाही. हजारो मराठी लोक येत असतील तर त्यांच्या काही अडचणी असतील. राहण्याच्या अडचणी आहेत, काही इतर अडचणी आहेत, काही वाहनांच्या अडचणी असतील. जर त्या मला सोडवता आल्या तर नक्की मला आनंद होईल. म्हणून मी दोन दिवस दिल्लीत थांबणार आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List