योगी सरकारची बनवाबनवी सुरूच; नदी प्रदूषणाबाबत जुना अहवाल दिल्याने हरित लवादाने फटकारले
उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरू आहे. या कुंभमेळ्यात मौनी अमावस्येला चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली होती. त्याबाबत योगी सरकारने लपवाछपवी केली. त्या दुर्घटनेतील मृतांची, जखमींची आणि बेपत्ता झालेल्यांची खरी आकडेवारी जाहीर करण्यात आली नाही. तसेच या दरम्यान प्रयागराज येथे होणारी वाहतूक कोंडी, गैरव्यवस्थापन यामुळे भाविकांचा रोष दिसून आला. आता योगी सरकारची आणखी एक बनवाबनवी उघड झाली आहे. त्रिवेणी संगमावरील प्रदूषणावरून आणि याबाबतचा जुना अहवाल सादर केल्याने हरीत लवादाने उत्तर प्रदेश सरकारला फटकारले आहे.
प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरू आहे. येथे मोठ्या संख्येने भाविक आल्याने हरीत लवादाने येथील पाण्याचे नमुन्यांवर आधारीत जलप्रदूषण आणि पाण्याच्या गुणवत्तेचा अहवाल मागवला होता. मात्र,योगी सरकारने पाण्याच्या जुन्या नमुन्यांवर आधारित संगम नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेबद्दल प्रतिज्ञापत्र सादर केले. याबाबत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाला चांगलेच फटकारले आहे.
संगम येथे विष्ठेतील बॅक्टेरियाचे प्रमाण जास्त आढळले, असे सीपीसीबीच्या अहवालात म्हटले आहे. मात्र, उत्तर प्रदेश प्रदूषण संस्थेने हरित न्यायाधिकरणाला दिलेल्या अहवालात पाण्याची गुणवत्ता उत्तम असून पाण्याचा दर्जा उत्तम असल्याचे म्हटले आहे. मात्र, अहवला सादर करताना जुन्या नमुन्यांवर आधारीत अहवाल सादर केल्याबद्दल न्यायाधिकरणाने उत्तर प्रदेश संस्थेला फटकारले आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) अहवालावरून वाढत्या प्रदूषमाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर लवादाने योगी सरकारला फटकारले आहे. भाविक सध्या महाकुंभमेळ्यात स्नान करत असलेल्या त्रिवेणी संगमच्या पाण्यात बॅक्टेरियाचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे.
न्यायालयासमोर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात, यूपीपीसीबीने पाण्याची गुणवत्ता उत्तम असल्याचे म्हटले होते. एका घाटावरील पुलाजवळच्या पाण्याचा अपवाद वगळता गंगा आणि यमुनेतील पाणी आंघोळीसाठी गुणवत्तेच्या निकषांचे पालन करत असल्याचे अहवालात म्हटले होते. मात्र, यूपीपीसीबीने अहवालासाठी घेतलेले नमुने 12 जानेवारीचे होते, असे लवादाने म्हटले आहे. जुन्या नमुन्यांवरील अहवलासाठी कागदपत्र का दाखल केले? तुम्ही आमचा वेळ वाया का घालवत आहात?असे सवाल करत हरीत लवादाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला फटकारले आहे.
यूपीपीसीबीकडून उपस्थित असलेल्या अतिरिक्त महाधिवक्तांनी लवादाला सांगितले की, त्यांच्याकडे अलिकडचे पाण्याचे नमुने उपलब्ध आहेत आणि ते एका आठवड्यात रेकॉर्डवर ठेवले जातील. तसेच जुन्या नमुन्यांचे अहवाल त्यांच्या प्रतिज्ञापत्रात समाविष्ट केले असले तरी, पाण्याचे नमुने नियमितपणे घेतले जात आहेत, असेही लवादाला सांगण्यात आले.
उत्तर प्रदेश सरकारने सारवासराव करत म्हटले आहे की, सीपीसीबीच्या अहवालात केलेल्या खुलाशांची पूर्णपणे तपासणी केली जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराजमधील पाण्याच्या खराब गुणवत्तेच्या अहवालांचा इन्कार केला आहे. तसेच जलप्रदूषणाबाबत हा विरोधकांचा प्रचार असल्याचे म्हटले आहे. महाकुंभमोळ्यात नदीचे पाणी स्नान करण्यासाठी योग्य असल्याचा दावाही त्यांनी केला.
सीपीसीबीच्या अलीकडील अहवालात असा दावा करण्यात आला आहे की प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यादरम्यान विविध ठिकाणी पाण्याची गुणवत्ता आंघोळीसाठी प्राथमिक मानकांची पूर्तता करत नव्हती कारण त्यात मल कोलिफॉर्मचे प्रमाण जास्त होते, जे सांडपाणी दूषित होण्याचे एक प्रमुख सूचक आहे. अहवालात पुढे असे म्हटले आहे की, सर्व देखरेख केलेल्या ठिकाणी पाण्याची गुणवत्ता अनेक वेळा मल कोलिफॉर्म (एफसी) संबंधित प्राथमिक स्नान मानकांची पूर्तता करण्यात अयशस्वी ठरली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List