धनंजय मुंडेंनी खोटं बोलून केला महाघोटाळा, मंत्रिमंडळात न झालेल्या निर्णयाचा आदेश काढून 200 कोटी उचलले; अंजली दमानिया यांचा आरोप
अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांचा कृषिमंत्रीपदाच्या कार्यकाळातील नवा प्रताप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज उघड केला. मंत्रिमंडळात निर्णय झाला नसतानाही मुंडे यांनी खोटा आदेश काढून 200 कोटी रुपयांचा निधी जारी केला आणि त्यानंतरही अतिरिक्त 500 कोटी रुपयांची मागणी केली, असा गंभीर आरोप दमानिया यांनी केला. त्यामुळे मुंडे यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.
कृषिमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळात निर्णय झाल्याचे दाखवून स्वतःच्या सहीनिशी खोटे आदेश काढले आणि सरकारी निधी लाटला. इतकेच नव्हे तर त्याचा जीआरही काढला असे अंजली दमानिया म्हणाल्या.
काय आहे प्रकरण…
23 सप्टेंबर आणि 30 सप्टेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत काही निर्णय झाले. परंतु यात कृषी विभागाशी संबंधित एकही निर्णय झाला नाही. असे असतानाही धनंजय मुंडे यांनी स्वतःच्या सहीने आदेश काढून 200 कोटी रुपये तात्काळ अदा करण्याचे फर्मान सोडले. याशिवाय त्यानंतर लगेचच ऑक्टोबरमध्ये अतिरिक्त 500 कोटी रुपयांची मागणीही करण्यात आली.
संतोष देशमुख प्रकरणात न्याय होणारच नाही
धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचे आर्थिक, राजकीय आणि गुन्हेगारी स्वरूपाचे संबंध उजागर झाले आहेत. कराड हा त्यांच्या व्यवसायात भागीदार आहे. हे सगळे समोर आले आहे. परंतु धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रिमंडळात आहेत तोपर्यंत संतोष देशमुख प्रकरणात न्याय होणारच नाही, असेही अंजली दमानिया म्हणाल्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List