तळसंदेत चोरट्यांचा धुमाकूळ; लाखोंचा ऐवज लंपास, घरफोड्यांमध्ये साडेअठरा तोळ्यांसह पन्नास हजार लांबविले
हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथे चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री धुमाकूळ घालत घरफोड्या करत साडेअठरा तोळे सोने व रोख पन्नास हजार रुपये लंपास केले. चोरट्यांनी चार घरे फोडली. मात्र, दोन घरांमध्ये त्यांच्या हाती काहीही लागले नाही. यावेळी नवजीवन दूध संस्थेचा सायरन वाजवल्याने गाव जागा झाला. त्यामुळे अन्य ठिकाणी चोरीचा प्रकार टळला. या घटनेने तळसंदे परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, रविवारी (दि. 16) जिल्हा पोलीसप्रमुख पंडित यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना सूचना केल्या. याप्रकरणी पेठ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
शनिवारी मध्यरात्री माणिक मोहिते यांच्या घराचे कडीकोयंडे तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. यावेळी त्यांचा मुलगा महेश याने खोलीत आवाज आल्याने त्याने दरवाजा उघडताच चोरट्यांनी पळ काढला. यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा महादेव चव्हाण यांच्या गावानजीक असलेल्या शेतातील घरात वळविला. त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. परंतु, घरात काहीच न मिळाल्याने त्यांनी घरातील कुऱ्हाड व कोयता नेला. नंतर चव्हाण यांच्या घराजवळील प्रदीप चव्हाण यांच्या घराची कडी कटावणीने तोडत घरात प्रवेश केला. यावेळी आवाजाने घरातील लोक जागे झाले. चोरट्यांनी प्रदीप चव्हाण यांच्या आईच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेली.
यानंतर चोरट्यांनी तळसंदे वारणानगर रोडवरील सीमा बायोटेकनजीक असलेल्या बाळासाहेब चौगुले वाठारकर यांच्या घराकडे मोर्चा वळविला. यावेळी बाळासाहेब हे पत्नीसह गावातील नातेवाईकांच्या घरी मयत झाल्याने रात्री गेले होते. त्यांचा मुलगा सुधीर बाहेरगावी गेल्याने त्यांनी घराला बाहेरून कुलूप लावले होते. परंतु, घरात त्यांची सून आणि चार वर्षांची नात दोघीच घरात होत्या. चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यांनी दोघींच्या गळ्याला चाकू लावून तिजोरी फोडून त्यातील अठरा तोळे सोने व रोख 45 हजार रुपये घेऊन पलायन केले. दोघींच्या आवाजाने शेजाऱ्यांना जाग आली. परंतु, चोरट्यांनी शेजाऱ्यांच्या घराला बाहेरून कडी लावली होती. या घटनेनंतर शेजाऱ्यांनी नवजीवन दूध संस्थेच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून सायरन वाजविण्यात आला. त्यामुळे गाव जागा झाला. तोपर्यंत चोरट्यांनी पलायन केले होते. चोरीची माहिती पेठ वडगाव पोलिसात दिल्यानंतर रविवारी जिल्हा पोलीसप्रमुख महेंद्र पंडित, गडहिंग्लजचे अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील व जयसिंगपूरच्या पोलीस उपअधीक्षक स्वाती साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देत पोलिसांना सूचना केल्या.
कार्यक्रम पडला महागात
■ बाळासाहेब चौगुले यांच्या नातेवाईकांच्या घरी सोमवारी कार्यक्रम होता. त्यामुळे त्यांनी कार्यक्रमासाठी आणि रविवारी बँकेस सुट्टी असल्याने शुक्रवारी बँकेतील लॉकरमधून सोन्याचे दागिने व रक्कम घरी आणून ठेवली होती. या ऐवजावरच चोरट्यांनी डल्ला मारल्याने कार्यक्रम चांगलाच महागात पडला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List