माझा राम गेला, लक्ष्मण कुठवर एकटा धावणार? सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुख यांच्या आईनं फोडला हंबरडा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेट दिली. या भेटीवेळी संतोष देशमुख यांची आई भावूक झाली. माझ्या लेकराला कुठं शोधू? असे म्हणत संतोष देशमुख यांच्या आईने हंबरडा फोडला. यावेळी सुप्रिया सुळे यांच्यासह उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले.
माझे लेकरू कुठं शोधू? मारेकऱ्यांना लेकरं, आई-वडील नाहीत का? एकट्या माणसाला गाठून मारले. त्यांना काहीच वाटले नाही का? असा सवाल संतोष देशमुख यांच्या आईने केला. संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवशी मी त्याची वाट पाहत बसले होते. स्वयंपाक करून ठेवला होता. त्याला फोन लावला. पाचच रिंग वाजल्या आणि नंतर फोन बंद झाला. माझे लेकरू गुणी होते, असे म्हणत संतोष देशमुख यांच्या आईने अश्रुंना वाट मोकळी करून दिली.
आरोपींचा सगळा बुडका-शेंडा शोधून काढा. त्यांना फाशीची शिक्षाच व्हायला हवी, अशी मागणी संतोष देशमुख यांच्या आईने केली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी मी तुमच्यासाठी लढेल, असे आश्वासन देशमुख कुटुंबाला दिले.
संतोष आणि धनंजय राम-लक्ष्मणाची जोडी होती. माझा राम गेला, लक्ष्मण कुठवर एकटा धावणार? असेही संतोष देशमुख यांची आई म्हणाली. तसेच माझे गाववाले खूप चांगले आहे, असे म्हणत त्यांनी संपूर्ण कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List