मोदींच्या योजनेला ठाण्यात जागाच नाही, पंतप्रधानांच्या आयुष्मान आरोग्यवर्धिनी दवाखान्यासाठी भाड्याच्या जागेचा शोध
मर्जीतील खासगी संस्थांना कोट्यवधी रुपयांचे पालिकेचे भूखंड आंदण देणाऱ्या मिंध्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी वैद्यकीय योजनेला मात्र वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. वैद्यकीय सेवा भक्कम करण्यासाठी शहरात आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्याची घोषणा केंद्र सरकारने केली खरी. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना मानली जाणाऱ्या आयुष्मान आरोग्यवर्धिनी दवाखान्याला ठाण्यात एक इंचही जागा मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे मोदींच्या संकल्पनेतील आरोग्य केंद्र उभारण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून कोणी जागा देता का? अशी म्हणण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
ही आरोग्य केंद्र चालवण्यासाठी ३४ ठिकाणी भाड्याने जागा मिळावी यासाठी प्रशासनाने नुकतीच निविदाही काढली. परंतु अद्याप तरी त्याला प्रतिसाद न मिळाल्याने मिंधेंनी ठरवून मोदींची ही संकल्पना मोडीत काढण्याची योजना आखली काय, असा सवाल विचारला जात आहे.
शहर विभागाचा कानाडोळा
आरोग्य विभागाकडून शहर विकास विभागाकडे जागांसाठी वारंवार विचारणा करण्यात आली होती. परंतु शहर विकास विभागाने आरोग्य विभागाला प्रतिसादच दिलेला नसल्याची बाब समोर आली आहे.
इथे कोणी भाड्याने जागा देता का जागा?
वाघबीळ गाव, आनंदनगर, इंदिरा पाडा, गायमुख, कापूरबावडी नाका, अशोकनगर, डोंगरीपाडा, कृष्णानगर, दिवा खान कंपाऊंड, रशीद कपाऊंड, कौसा, बी. आर. नगर, डवलेनगर, भास्करनगर, महात्मा फुलेनगर, खारेगाव, शांतीनगर, राणानगर रेतीबंदर, वाघोबानगर, शिवाजीनगर तसेच नौपाड्यातील धर्मवीरनगर, विष्णूनगर येथे कोणी भाड्याने जागा देता का जागा, असा जोगवा महापालिकेने निविदा काढून मागितला आहे.
■ केंद्र आणि राज्य सरकारकडून आपला दवाखान्यांच्या धर्तीवर नागरी आयुष्मान आरोग्यवर्धिनी केंद्र योजना राबविण्यात येत आहे.
■ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ही योजना देशभरात अमलात आणली जाणार आहे.
■ या योजनेंतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण 68 आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
■ यातील अवघी 6 केंद्रे सुरू झाली आहेत.
■ 28 केंद्रे सुरू करता येणे शक्य नसल्याचे आरोग्य विभागाने केंद्राला कळवल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
■ नऊ प्रभाग समिती अंतर्गत उर्वरित 34 ठिकाणी ही आरोग्य केंद्रे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र त्यासाठी पालिकेचा एकही भूखंड दिलेला नाही. हे दवाखाने सुरू करण्यासाठी महापालिकेने भाड्याने जागा मिळाव्यात यासाठी निविदा काढल्या आहेत. परंतु त्याला अद्याप तरी प्रतिसाद मिळालेला नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List