‘न्यू इँडिया बँक’ घोटाळ्यात सगळे भाजपचे लोक, BJP आमदाराच्या दबावाखाली कर्जवाटप; संजय राऊत यांचा आरोप
मुंबईतील न्यू इंडिया बँकेत 122 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी महाव्यवस्थापक हितेश मेहता आणि धर्मेश जयंतीलाल पौन यांना अटक केली. न्यायालयाने या दोघांनाही 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. भारतीय जनता पक्षाने रिझर्व्ह बँकेच्या मदतीने आमची बँक बुडवली, असा आरोप करत ठेवीदारांनी भाजपा आमदार राम कदम यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली. सोमवारी सकाळी ते माध्यमांशी बोलत होते.
मुंबईमध्ये न्यू इंडिया बँक ज्या प्रकारे लुटली गेली त्याच्यामध्ये सगळे भाजपचे लोक आहेत. या बँकेत जनतेचा पैसा आहे. पण येथे सर्व बिल्डर, मेहता, जैन आणि भाजपाचे कदम आहेत. आता कुठे गेले मुलुंडचे पोपटलाल? एवढी मोठी शेकडो कोटींची बँक लुटली गेली, पोपटलाल कुठल्या बिळात लपले आहेत? गरीब, सर्वसामान्य टॅक्सी चालकांचा पैसा या बँकेत आहे. भाजपने बँक लुटली म्हणून पोपटलाल बोलत नाही का? जॉर्ज फर्नांडिस यांनी स्थापन केलेली ही बँक आहे. आता पोपटलाल कादगपत्र, पुरावे घेऊन ईडीकडे का जात नाहीत? पत्रकार परिषद का घेत नाहीत? भाजपाचे आमदार यात अडकले म्हणून तोंडाला बुच बसले आहे का? असा सवाल राऊत यांनी केला.
भाजपा आमदाराच्या दबावाखाली कर्जवाटप झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच्यावर उत्तर दिले पाहिजे. काय आणि कुणावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत? ज्यांना पैसे मिळाले ते सर्व बिल्डर भाजप आणि आरएसएसशी संबंधित आहेत. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. या देशात विरोधी पक्षाच्या लोकांना एक न्याय आणि सत्ताधाऱ्यांना दुसरा न्याय आहे. मग कोणता समान नागरी कायदा तुम्ही आणताय? असा हल्लाबोलही राऊत यांनी केला.
‘पापा ने वॉर रुकवा दी’ म्हणणारे…
अफगाणिस्तानंतर अमेरिकेचे लष्करी विमान उतरणारा हिंदुस्थान दुसरा देश आहे. हिंदुस्थानींना पुन्हा बेड्या घालून आणले, शीख बांधवांच्या पगड्या उतरवल्या गेल्या. भाजपला हा देशाचा अपमान वाटत नाही का? मोदी रशिया-युक्रेन युद्ध थांबवू शकतात, आंधळे भक्त पापा ने वॉर रुकवा दी म्हणतात. पण हेच मोदी हिंदुस्थानींच्या पायातील बेड्या काढू शकले नाहीत. 56 इंच छाती घेऊन गेले, पण ट्रम्पने टाचणी टोचली आणि छाती लहान करून परत आले. मोदींनी तिथे जाऊ काय केले? असा सवाल राऊत यांनी केला.
इथं पाप करताहेत आणि तिथे जाऊन डुबक्या घेताहेत
भाजपचे लोक स्वत:ला राष्ट्रभक्त समजतात. पण कुंभच्या नावाखाली हिंदू तुडवला जात आहे. मग दिल्लीतील रेल्वे प्लॅटफॉर्म असो नाही तर प्रयागराज असो. सरकार कुठे आहे, काय करतेय? मुख्यमंत्री, मंत्री तिथे जाऊन आंघोळ करताहेत. इथं पाप करताहेत आणि तिथे जाऊन डुबक्या मारताहेत, अशी टीकाही राऊत यांनी केली.
शिवसेना मजबूत
शिवसेना पक्ष मजबूत आहे. निवडणुकीमध्ये जय-पराजय होत असतो. भाजपचेही दोन खासदार होते. एक दिवस शिंदेंचा एकही आमदार निवडून येणार नाही असे वातावरण निर्माण होईल. आज अमित शहा, ईव्हीएमची कृपा आहे. पैशांची बरसात आहे. एक निवडणूक आमच्या हातून गेली, पण 2029 ला चित्र बदललेले असेल. तोपर्यंत भाजप-शिंदेही एकत्र राहणार नाहीत. शिंदेंचे काम झालेले आहे. त्यांचे काम तमाम होणार आहे हे त्यांना आणि त्यांच्या लोकांनाही माहितीय. स्टँपपेपरवर लिहून घ्या, त्यांचा पक्ष किंवा एक मोठा गट कोकणातील नेत्याबरोबर भाजपमध्ये विलीन होईल, असा दावाही राऊत यांनी केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List