हितेश मेहताने विकासक धर्मेश जैनला दिले 70 कोटी
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील 122 कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने महाव्यवस्थापक हितेश मेहता याच्यानंतर विकासक धर्मेश जयंतीलाल जैनला अटक केली आहे. हितेश मेहताने मे ते डिसेंबर 2024 या काळात 70 कोटी आणि जानेवारी 2025 मध्ये 50 लाख रुपये जैन याला दिल्याचे तपासात समोर आले आहे. तर उन्ननाथन अरुणाचलम ऊर्फ अरुणभाई हा आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. मेहता आणि जैनला अटक करून आज सुट्टीकालीन न्यायालयात हजर केले असता त्यांना 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत झालेल्या अपहारप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तो पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. गुन्हा नोंद होताच आर्थिक गुन्हे शाखेने मेहताला ताब्यात घेतले. त्याने प्रभादेवी आणि गोरेगाव येथील शाखेतील 122 कोटींचा अपहार केला आहे. त्याच्या चौकशीत विकासक धर्मेशचे नाव समोर आले. काही दिवसांपूर्वी बँकेतील अपहारप्रकरणी हितेश मेहताची आरबीआयने देखील चौकशी केली होती. मेहता याने जैन याला मे ते डिसेंबर 2024 या काळात 70 कोटी आणि जानेवारी 2025 मध्ये 50 लाख रुपये दिल्याचे पोलिसांनी आज न्यायालयात सांगितले.
122 कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी हितेश हा पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे देत आहे. हितेश हा ज्या शाखेत काम करत होता, तेथील काही बँक कर्मचाऱयांचा यात काही सहभाग आहे का, हे तपासणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. हितेशने प्रभादेवी आणि गोरेगाव शाखेतील रक्कम काढली आहे. दोन शाखांतून रक्कम काढताना त्याला तेथे कोणी मदत केली होती का, विकासक धर्मेश जैन याला ती रक्कम कशी आणि कुठे दिली होती, याबाबत पोलीस हितेशची चौकशी करणार आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List