“21 कोटी फी घेऊन करीना साधं एका..”; सैफवरील हल्ल्याबाबत अभिनेत्याचा सवाल
गेल्या महिन्यात अभिनेता सैफ अली खानवर मुंबईतील त्याच्यात राहत्या घरात एका चोराने चाकूहल्ला केला. वांद्रे इथल्या इमारतीतील बाराव्या मजल्यावर राहणाऱ्या सैफच्या घरात मध्यरात्री एक चोर शिरला होता. त्याच्यासोबत झालेल्या झटापटीत चोराने सैफवर चाकूने सहा वार केले. यानंतर सैफला ऑटोरिक्षामधून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या घटनेनंतर सोशल मीडियावर विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली. अभिनेत्याच्या घरातील सुरक्षा, इमारतीतील सीसीटीव्ही, घरातील सीसीटीव्ही कॅमेरे, ऐनवेळी उपलब्ध नसलेला गाडीचा ड्राइव्हर या सर्व मुद्द्यांबाबत नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले. आता आकाशदीप साबिर आणि त्यांची पत्नी शीबा यांनी सैफ-करीनाला टोला लगावला आहे. इतकी कमाई करूनही ते एक सुरक्षारक्षक आणि फुल-टाइम ड्राइव्हर ठेवू शकत नाही का, असा सवाल त्यांनी केला.
‘लेहरे रेट्रो’ला दिलेल्या मुलाखतीत आकाशदीप आणि शीबा हे इंडस्ट्रीत स्त्री-पुरुषांना दिल्या जाणाऱ्या मानधनातील तफावतीबद्दल चर्चा करत होते. साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनने प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणलं, म्हणून त्याला 100 कोटींपेक्षा जास्त मानधन आणि रश्मिका मंदानाला फक्त 10 कोटी रुपये मिळाले, असं मत त्यांनी नोंदवलं. यावेळी आकाशदीप करीनावर टीका करत म्हणाला, “म्हणून कदाचित 21 कोटी रुपये मानधन घेणारी करीना तिच्या घराबाहेर एका वॉचमनला ठेवू शकली नाही.”
“जेव्हा तुम्ही त्यांना 100 कोटी रुपये मानधन द्याल, तेव्हा कदाचित ते सुरक्षारक्षक आणि रात्रीच्या वेळीही ड्राइव्हरला कामावर ठेवू शकतील”, असं म्हणत ते हसतात. पुढे “ऑटो..” असं म्हणूनही ते हसू लागतात. करीना आणि सैफविषयी ते पुढे सांगतात, “जेव्हा मी करीनाला भेटलो, तेव्हा ती लहान होती. सैफ आणि करीनाची बाजू मांडण्यासाठी मी टीव्हीवरील चर्चेत भांडलोय. मी करिष्मा कपूरच्या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मितीसुद्धा केली. करीना आणि सैफ हे दोघं खूप चांगले आहेत. पण जेव्हा चर्चेत मला दोन गोष्टींविषयी विचारलं गेलं, तेव्हा माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं. एकतर त्यांच्या घराबाहेर सुरक्षारक्षक का नव्हता आणि त्यांच्याकडे फुलटाइम गाडी चालवण्यासाठी ड्राइव्हर का नव्हता? एका इमारतीत 30 सीसीटीव्ही असले तरी त्यामुळे तुम्ही गुन्हेगाराला अडवू शकत नाही. त्यासाठी सुरक्षारक्षक हवा.” सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List