कोण आहे ‘ती’ बांग्लादेशी अभिनेत्री? तिच्यावर देशद्रोह आणि देशाविरुद्ध कट रचल्याचा आरोप
बांग्लादेशची प्रसिद्ध अभिनेत्री मेहर अफरोज शॉन हिला देशाविरुद्ध कट रचल्याच्या आरोपात अटक केली आहे. त्यामुळे अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ होऊ शकते. बांगलादेशची राजधानी ढाका येथील धानमंडी परिसरातून मेहर हिला अटक करण्यात आली आहे. तिच्यावर देशद्रोहाचा आणि देशाविरुद्ध कट रचल्याचा आरोप आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीला गुरुवारी रात्री अटक करण्यात आली आहे अतिरिक्त पोलीस आयुक्त रजाउल करीम मलिक यांनी सांगितल्यानुसार, मेहर अफरोज शॉन देशाविरुद्धच्या कटात सहभागी होती. मात्र, या प्रकरणाबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही.
शुक्रवारी पोलिस मेहर हिला कोर्टात हजर करून रिमांडची मागणी करू शकतात. जेणेकरून पोलिसांना याप्रकरणी अधिक चौकशी करता येईल.
मेहर अफरोज शॉन हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, मेहर बांग्लादेशची प्रसिद्ध अभिनेत्री असून गायक, डान्सर आणि दिग्दर्शिका देखील आहे. तिला लहापणीच अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. त्यानंतर मेहर हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे.
बांग्लादेशमध्ये सर्वत्र खळबळ
मेहर अफरोज हिला अटक होण्याच्या एक दिवस आधी म्हणजे बुधवारी येथे बांगलादेशचे संस्थापक नेते शेख मुजीबुर रहमान यांच्या घराची तोडफोड करून आग लावण्यात आली. शेख हसीना यांनी एका भाषणात अवामी लीगच्या कार्यकर्त्यांना मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचे आवाहन केलं होतं. बुधवारी आंदोलकांनी बुलडोझर घेऊन धामंडी 32 परिसरात पोहोचून घर पाडण्याची धमकी दिली.
अवामी लीगच्या निषेधापूर्वी केवळ मेहर अफरोज शॉनच नाही तर पक्षाच्या अनेक समर्थक आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. गुरुवारी बांगलादेशची वाहतूक व्यवस्था बंद करून ढाकासह अनेक महामार्ग रोखण्याची योजना पक्षाने आखली होती. गेल्या वर्षी 5 ऑगस्ट रोजी हसीना सरकार पडल्यानंतर बांगलादेशात अशांतता आहे.
युनूस सरकारने भारताला वारंवार हसीनाच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती, परंतु भारताने त्यांच्या व्हिसाचा कालावधी वाढवला आहे. हसीना यांच्यावर अनेक न्यायालयीन खटले आहेत, त्यापैकी काही मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांशी संबंधित आहेत.
गेल्या 37 वर्षांपासून मेहर बांग्लादेशी सिनेविश्वात सक्रिय आहे. 1998 साली प्रसारित झालेल्या ‘स्वधिनोता’ चा मालिकेतून अभिनेत्री करीयरला सुरुवात केली. ज्यामध्ये मेहर बालकलाकार म्हणून झळकली होती. तिने अमर् अचे जोल् (2008), श्यामोल छाया (2004), चंद्रकोथा (2003), आज रोबीबार (1996) यांसारख्या मालिका आणि शोमध्ये काम केलं आहे.
मेहर अफरोज शॉन हिचे आई – वडील
अभिनेत्रीचे वडील मोहम्मद अली अभियंता आहेत. ते 12व्या राष्ट्रीय संसदेच्या निवडणुकीत अवामी लीगचे उमेदवार होते. मेहर हिचं कनेक्शन बांगलादेशच्या राजकीय कुटुंबाशी आहे. अभिनेत्रीची आई ताहुरा अली शेख हसीना बांगलादेश अवामी लीग पक्षाच्या खासदार होत्या.
वादाच्या भावऱ्यात मेहर
आता देशाविरुद्ध कट रचल्याच्या आरोपावरून मेहर अफरोज शॉनचं हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. पोलिसांच्या चौकशीत काही माहिती बाहेर येते का, हे पाहाणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर तिने लेखक-दिग्दर्शक हुमायून अहमदसोबत लग्न केलं आहे.
मेहर हिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. 2016 मध्ये Krishnopokkho नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका श्रेणीत राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर मेहर तुफान चर्चेत आली होती. तिच्या चाहत्यांची संख्या देखील वाढली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List