‘छावा’चा सेट पाडला, दीड महिना ब्रेक घेतला..; छत्रपती संभाजी महाराजांच्या छळाच्या सीनबद्दल दिग्दर्शकांचा खुलासा
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. याच्या टीझर आणि ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराजांची तर अभिनेक्षी रश्मिका मंदाना ही महाराणा येसुबाई यांची भूमिका साकारतेय. औरंगजेबाच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना आहे. या चित्रपटासाठी विकी कौशलने प्रचंड मेहनत घेतल्याचं दिग्दर्शकांनी विविध मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी शूटिंगदरम्यान एक प्रसंग सांगितला. या प्रसंगानंतर जवळपास दीड महिना चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आलं होतं आणि संपूर्ण सेट पूर्णपणे पाडण्यात आला होता.
उतेकरांनी या मुलाखतीत शूटिंगदरम्यान तो प्रसंग सांगितला, तेव्हा शूटिंगदरम्यान विकीचे हात संपूर्ण रात्रभर बांधून ठेवण्यात आले होते. तरीसुद्धा त्याने कोणतीच तक्रार केली नव्हती. ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “टॉर्चर सीनच्या शूटिंगच्या पहिल्याच दिवशी आम्हाला समजलं की हा तोच दिवस होता, जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करण्यात आला होता. योगायोगाने आम्ही त्याच दिवशी त्या सीनचं शूटिंग करत होतो.”
विकीला झालेली दुखापत आणि त्याचा चित्रपट निर्मितीवर कसा परिणाम झाला, याविषयी त्यांनी पुढे सांगितलं, “संपूर्ण रात्रभर विकीचे हात बांधले होते. जेव्हा आम्ही दोरीला बांधलेले त्याचे हात सोडवले, तेव्हा तो त्याचे हात खाली वाकवूच शकत नव्हता. इतके तास दोरखंडाने हात वर बांधल्याने ते आखडले होते. त्यासाठी आम्हाला दीड महिन्यांचा ब्रेक घ्यावा लागला होता. या काळात आम्ही तो सेट पूर्णपणे पाडला. विकीला बरं होण्यासाठी आम्ही तो वेळ दिला. त्यानंतर पुन्हा सेट बांधण्यात आला आणि पुन्हा आम्ही शूटिंग केली.”
या चित्रपटात अभिनेता अक्षय खन्ना हा मुघल शासक औरंगजेबच्या भूमिकेत आहे. टीझर आणि ट्रेलरमधील अक्षय खन्नाच्या भूमिकेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. यापूर्वी कधीच न दिसलेल्या अंदाजात अक्षय प्रेक्षकांसमोर येणार आहे. विकी कौशल आणि अक्षय खन्ना या दोघांमधील संघर्षाचा मोठा सीन शूट करण्यापूर्वी त्यांनी एकमेकांसमोर येणं टाळलं होतं. याविषयी उतेकर यांनी एका मुलाखतीत खुलासा केला होता. ‘छावा’ हा चित्रपट येत्या 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List