शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुखांना आदरांजली, राज्यभरातून शिवसैनिकांची स्मृतिस्थळावर रीघ
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी दादरच्या शिवतीर्थावर मुंबईसह राज्यभरातून शिवसैनिक, शिवसेनाप्रेमींनी स्मृतिस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह आबालवृद्धांनी सकाळपासून बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी रीघ लावली होती. स्मृतिस्थळावरील अखंड तेवत्या तेजस्वी ज्योतीच्या साक्षीने चाफा, गुलाबाची फुले तसेच पुष्पहार वाहून बाळासाहेबांचे आशीर्वाद घेतले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसैनिकांचे दैवतच! त्यामुळे शिवसेनाप्रमुखांचे शिवतीर्थावरील स्मृतिस्थळ म्हणजे शिवसैनिकांसाठी शक्तिस्थळ ठरले आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या मनात ज्वलंत हिंदुत्वाचे स्फुल्लिंग चेतवले. मुंबई-महाराष्ट्रात मराठी माणसाला स्वाभिमानाने, ताठ मानेने जगण्याचा मंत्र दिला. शिवसेनाप्रमुखांनी देव, देश आणि धर्मासाठी झोपून देणाऱ्या पिढय़ा निर्माण केल्या. लाखो, करोडो लोकांमध्ये अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची ऊर्मी निर्माण केली. अशा तेजस्वी आणि शिवतेज असलेल्या उत्तुंग नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी मुंबईच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून हजारोंच्या संख्येने शिवसेनाप्रेमी आले होते. दादरच्या शिवतीर्थावरील स्मृतिस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना नेते खासदार अनिल देसाई, आमदार महेश सावंत, अजय चौधरी, पैलाश पाटील, प्रवीण स्वामी, माजी आमदार विनोद घोसाळकर, दगडू सकपाळ, माजी महापौर किशोरी पेडणेकर, उपनेते दत्ता दळवी, उपनेत्या सुषमा अंधारे, माजी नगरसेविका उर्मिला पांचाळ, शाखाप्रमुख मिनार नाटळकर, संदीप चिवटे, शिव आरोग्य सेनेचे जितेंद्र सकपाळ यांच्यासह शिवसेनेच्या अंगीपृत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
माहीममध्ये राहणारे 78 वर्षांचे ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश तोडणकर यांनी तुतारी वाजवून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.
जालना जिह्यातून शिवसेनेची निशाणी असलेली मशाल घेऊन राधेश्याम हटवार आणि अंपुश पवार हे शिवसैनिक आले होते.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त पालिकेच्या माध्यमातून शक्तिस्थळावर फुलांची आकर्षक सजावट करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
स्मृतिस्थळावर लहान मुले, दिव्यांग, वृद्ध यांच्यासह राजकीय, सामाजिक, साहित्य, कला अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहत बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.
राज्यपालांकडून अभिवादन
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त आणि आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधापृष्णन यांनी राजभवन येथे अभिवादन केले. यावेळी राज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघल, राज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शिवसेनाप्रमुखांना पोलिसांनीही अभिवादन केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी आमदार महेश सावंत, उपसचिव प्रवीण पंडित, यशवंत विचले, सिद्धार्थ चव्हाण उपस्थित होते.
नागरी संरक्षण दलाच्या महिलांनी बाळासाहेबांना सलामी दिली.
केरळ शिवसेना कार्यकारिणीच्या सदस्यांनीही बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List