सामना अग्रलेख – अफवेचे बळी!
रेल्वेच्या तांत्रिक व मानवी चुकांमुळे गेल्या दोन-चार वर्षांत असंख्य रेल्वे दुर्घटना घडल्या व त्यात अनेकांचे बळी गेले; हे खरे असले तरी जळगावच्या रेल्वे दुर्घटनेत मात्र प्रवाशांचीच चूक आहे, असे दिसते. रेल्वेमध्ये कुठलीही आग दिसत नसताना केवळ ऐकीव माहितीवर विश्वास ठेवून धावत्या रेल्वेतून प्रवाशांनी उड्या माराव्यात याला काय म्हणावे? खऱ्याखुऱ्या दुर्घटनेत प्रसंगावधान राखून उडी मारणे वेगळे, पण खोट्या माहितीवर विश्वास ठेवून स्वतःला मृत्यूच्या हवाली करणे, हा दैवदुर्विलासच म्हणायला हवा. जळगावच्या रेल्वे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले प्रवासी हे अफवेचे बळी आहेत, पण 13 जणांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या या अफवाखोरांना कसे शोधून काढणार?
एक अफवा किती भयंकर घात करू शकते, याचेच दुर्दैवी प्रत्यंतर बुधवारच्या रेल्वे दुर्घटनेतून देशाला घडले. लखनौहून मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली व या खोट्या माहितीने जळगावच्या परधाडे गावाजवळ मृत्यूचे तांडव घडवले. आगीच्या माहितीची कुठलीही शहानिशा न करता प्रवाशांनी रेल्वेतून दोन्ही बाजूने उड्या टाकल्या. यापैकी एका बाजूने उड्या मारणारे प्रवासी नशीब बलवत्तर म्हणून बचावले; पण दुसऱ्या बाजूने ज्यांनी उड्या मारल्या त्यांनी सरळसरळ स्वतःहून मृत्यूला मिठी मारली, असेच म्हणावे लागेल. काही तरुण प्रवाशांनी धावत्या रेल्वेतून उड्या मारल्या, पण गाडीचा वेग जास्त असल्याने सगळ्यांनाच उड्या मारणे शक्य झाले नाही. एवढ्यात कोणीतरी साखळी ओढली आणि दरवाजे व खिडक्यांतून जमेल तसे लोक खाली उतरून पळत सुटले. पुष्पक एक्प्रेसमधून उतरलेले प्रवासी बाजूच्या रेल्वे रुळावर असतानाच बंगळुरूहून दिल्लीला जाणारी कर्नाटक एक्प्रेस याच रुळावरून प्रचंड वेगाने आली आणि रुळावर असलेल्या प्रवाशांना चिरडून पुढे काही अंतरावर जाऊन थांबली. जिवाचा
थरकाप उडवणाऱ्या
काही सेकंदांच्या या दुर्घटनेत 13 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 22 प्रवासी जखमी झाले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. घटनास्थळावरील दृश्य अत्यंत विदारक व हृदयद्रावक होते. छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडलेले मृतदेह, विखुरलेले अवयव, रक्ताचे थारोळे असे दृश्य पाहून बचावकार्यासाठी गेलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जिवाचा थरकाप उडाला. सोबत कुणी नातेवाईक नसल्याने या मृतदेहांजवळ आक्रोश करायलाही कुणी नव्हते. आगीची अफवा कानावर पडूनही उड्या मारता मारता जे प्रवासी थांबले त्यांच्याही काळजाचा ठोका चुकला. कुणीतरी रेल्वेत ठिणग्या उडाल्याची माहिती आधी पसरवली आणि अफवेखोरांनी तीच बातमी वाढवून-चढवून एका डब्यातून दुसऱया डब्यापर्यंत पोहोचवली. त्यातच रेल्वेतील चहावाल्यांनी अफवेच्या आगीत आणखी तेल ओतले. रेल्वेला आग लागल्याची व पँट्री कारमधून धूर निघत असल्याची धादांत खोटी माहिती देत चहावाल्यांनी अधिक गोंधळ उडवला, असे रेल्वेतील प्रवाशांचे म्हणणे आहे. ते खरे असेल तर अफवाखोरांवर कठोर कारवाई व्हायला हवी; मात्र
अफवाखोरांना शोधायचे कसे
हे रेल्वे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. दुर्घटनेनंतर काही वेळाने पुष्पक एक्प्रेस पुढच्या प्रवासाला निघून गेली, याचा अर्थ या रेल्वेत ना आग लागली होती, ना कुठला दोष होता. तरीदेखील ही विचित्र रेल्वे दुर्घटना नेमकी कशी घडली व या अपघातास जबाबदार कोण, याविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र या दुर्घटनेस रेल्वे प्रशासनास नक्कीच जबाबदार धरता येणार नाही. रेल्वेच्या तांत्रिक व मानवी चुकांमुळे गेल्या दोन-चार वर्षांत असंख्य रेल्वे दुर्घटना घडल्या व त्यात अनेकांचे बळी गेले; हे खरे असले तरी जळगावच्या रेल्वे दुर्घटनेत मात्र प्रवाशांचीच चूक आहे, असे दिसते. रेल्वेमध्ये कुठलीही आग दिसत नसताना केवळ ऐकीव माहितीवर विश्वास ठेवून धावत्या रेल्वेतून प्रवाशांनी उड्या माराव्यात याला काय म्हणावे? खऱयाखुऱ्या दुर्घटनेत प्रसंगावधान राखून उडी मारणे वेगळे, पण खोटय़ा माहितीवर विश्वास ठेवून स्वतःला मृत्यूच्या हवाली करणे, हा दैवदुर्विलासच म्हणायला हवा. जळगावच्या रेल्वे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले प्रवासी हे अफवेचे बळी आहेत, पण 13 जणांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या या अफवाखोरांना कसे शोधून काढणार?
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List