हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ‘भारतरत्न’ द्या! शिवसेनेची केंद्र सरकारकडे मागणी
देशातील हिंदू आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाला अस्मितेसाठी स्वाभिमानाने लढण्याची प्रेरणा देणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी किताब देऊन गौरवण्यात यावे, अशी मागणी आज शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारला करण्यात आली. ही केवळ शिवसेनेची मागणी नसून महाराष्ट्रातील मराठी जनतेची आणि जगभरातील तमाम हिंदूंची लोकभावना आहे, असे शिवसेना नेते-खासदार संजय राऊत म्हणाले.
शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी शिवसेना भवन येथे आज शिवसेनेच्या नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्याप्रसंगी शिवसेनेच्या वतीने खासदार संजय राऊत यांनी ही मागणी केली. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राला स्वाभिमानाने लढण्याची प्रेरणा दिली. मराठी माणूस आणि त्याचा स्वाभिमान शिल्लक राहिलाय त्याचे श्रेय बाळासाहेबांनाच दिले जाते. म्हणूनच आपण त्यांना मराठी मनाचे मानबिंदू असे म्हणतो. बाळासाहेब आज आपल्यात नाहीत, पण त्यांच्या विचारांनी ते महाराष्ट्राच्या कणाकणात आजही पाहायला मिळतात.
भारतरत्न देण्यासाठी राज्याच्या शिफारशीची गरज नाही
कुणाला भारतरत्न द्यायचा असेल तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील समिती केंद्राला शिफारस करते असा मुद्दा यावेळी पत्रकारांनी उपस्थित केला. त्यावर संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेबांना भारतरत्न देण्याची मागणी करण्याची गरजच नाही. सरकारला ते कळले पाहिजे. भारतरत्न देण्याचा अधिकारी देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचा आहे. अनेक नेते असे आहेत ज्यांच्या नावाची शिफारस करण्याची कधी गरज पडली नाही. उदाहरणार्थ राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम, सर्वपल्ली राधाकृष्णन, पंडित नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव, स्वामिनाथन, लता मंगेशकर, पंडित भीमसेन जोशी, एमजीआर, एनटीआर, कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न देण्यासाठी कोणत्याही राज्याने शिफारस केली नव्हती. कोणतेही राज्य भारतरत्नसाठी शिफारस करत नाही. हा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान असतो आणि त्याचा निर्णय केंद्र सरकारची समिती घेते. हा संपूर्ण गृह मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाच्या अखत्यारितला विषय आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावा अशी मागणीही शिवसेनेने सातत्याने केली, मात्र अद्याप केंद्राने काहीच प्रतिसाद दिलेला नाही असे पत्रकारांनी यावेळी संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. भाजपचे वीर सावरकरांवरील प्रेम म्हणजे ढोंग आहे. भाजपचे हिंदुत्व ढोंगी आहे. हिंदुत्वासाठी देशात दोनच नेत्यांनी सर्वोच्च बलिदान केले आहे. पहिले म्हणजे वीर सावरकर ज्यांना हिंदुहृदयसम्राट म्हणूनच लोक ओळखत होते आणि दुसरे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे यांचा सन्मान हा वीर सावरकरांचाही सन्मान होतो. कारण सावरकरांचाच हिंदुत्वाचा विचार बाळासाहेबांनी पुढे नेला आहे. हे दोन हिंदुहृदयसम्राट आहेत, पण त्यांना उपेक्षित ठेवण्याचे काम स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या केंद्रातल्या मोदी सरकारने केला, अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी केली.
सावरकरांना भारतरत्न देणे काँग्रेसला पटेल का, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, शिवसेना भाजपबरोबर होती तेव्हाही सावरकरांसाठी भारतरत्न मागितले आणि आता काँग्रेसबरोबर असतानाही मागत आहोत. शिवसेना कुणाला घाबरत नाही. इतिहास पाहिला तर वीर सावरकरांचा यथोचित सन्मान सरकारने करावा अशी मागणी बाळासाहेबांनीही केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकासाठीही बाळासाहेबांनी सहकार्य केले होते. ते स्मारक बाळासाहेबांमुळेच निर्माण झाले आहे, याची आठवणही संजय राऊत यांनी करून दिली.
या पत्रकार परिषदेला शिवसेना नेते दिवाकर रावते, विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत आणि आमदार महेश सावंत आदी उपस्थित होते.
मोदी सरकारने मतांसाठी अनेकांना भारतरत्न दिले
गेल्या 12 वर्षांत मोदी सरकारने मतांसाठी आणि राजकीय गणितांसाठी अनेकांना भारतरत्न दिले आहे. कुणाचे नाव घेऊन आम्हाला अपमान करायचा नाही, पण ज्यांचे राज्यातही तेवढे ताकदीचे काम नाही आणि जे देशाला माहीत नाही अशा अनेकांना भारतरत्न देऊन मोदी सरकारने आपला राजकीय स्वार्थ साधला, अशी टीका संजय राऊत यांनी यावेळी केली. भारतरत्न मिळाले त्यांचा शिवसेना सन्मान करते, पण ज्यांनी देशातील हिंदूंना हिंदू म्हणून आणि महाराष्ट्राला मराठी म्हणून अस्मिता दिली, अयोध्येतील राम मंदिर ज्यांच्यामुळे उभे राहिले अशा हिंदुहृदयसम्राटांना भारतरत्न देऊन सन्मानित करावे, असे संजय राऊत म्हणाले.
बाळासाहेब 50 वर्षांच्या कार्यकाळात देशातील कोणत्याही संवैधानिक पदावर राहिले नाहीत तरीही त्यांनी देशातील जनतेच्या मनावर राज्य केले. लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्यानंतर बाळासाहेब हे देशातील सर्वात लोकप्रिय नेते होते, असे प्रशंसोद्गार संजय राऊत यांनी यावेळी काढले.
राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना पत्र
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न किताब देण्यात यावा अशी विनंती करणारे पत्र शिवसेनेच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. विधिमंडळातील शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी हे पत्र दिले. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र आणि देशातील जनतेच्या सेवेसाठी आपले आयुष्य अर्पण केले. ते सामान्य माणसाचा आवाज होते. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी त्यांनी संघर्ष केला. राजकारणाच्याही पुढे जाऊन त्यांनी समाजासाठी योगदान दिले. लोककल्याणाप्रति त्यांची बांधिलकी आणि राष्ट्रीय अखंडतेबद्दलची त्यांची अटळ भूमिका कोटय़वधी हिंदुस्थानींच्या हृदयात कोरलेली आहे. त्यांचा वारसा वर्तमान आणि भावी पिढ्यांना राष्ट्राच्या भल्यासाठी कार्य करण्यासाठी प्रेरणा देत आहे, असे त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
- 23 जानेवारी 2026 पासून शिवसेनाप्रमुखांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्त बाळासाहेबांचा भारतरत्न देऊन गौरव करण्यात यावा अशी जनभावना आहे. शिवसेनेच्या आणि हिंदूंच्या अनेक संघटनांनी तसा ठराव मंजूर केला आहे. शिवसेनेने संसदेत, संसदेबाहेर आणि विधिमंडळातही ही मागणी वारंवार केली आहे.
ट्विटरवर बाळासाहेबांना आदरांजली वाहता, भारतरत्नची घोषणाही करा!
मोदी- शहांनी आज शिवसेनाप्रमुखांना सोशल मीडियावरून आदरांजली वाहिली. त्याचा उल्लेख करत संजय राऊत म्हणाले की, नुसते ट्विट करण्यापेक्षा आणि महाराष्ट्रात येऊन भाषणात बाळासाहेबांच्या नावाने आम्हाला ज्ञान देण्यापेक्षा सरकारने त्यांचा भारतरत्न देऊन सन्मान करावा. शिवसेनाप्रमुखांचा खरंच सन्मान करायचा असेल तर ट्विटरवर आदरांजली अर्पण करण्यापेक्षा 26 जानेवारीला त्याच ट्विटरवर शिवसेनाप्रमुखांना भारतरत्न जाहीर केल्याचा संदेश पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी द्यावा आणि महाराष्ट्राची व तमाम हिंदूंची मागणी आहे त्यास मान्यता द्यावी.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List