धर्मवीरांच्या नावाखाली स्वतःचे ब्रँडिंग; मिंधेंच्या बेगडी प्रेमाचा पर्दाफाश, आनंद दिघे यांचे स्मारक कागदावरच
धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाखाली सिनेमे काढून स्वतःचे ब्रँडिंग करणाऱ्या मिंधेंच्या बेगडी प्रेमाचा पर्दाफाश झाला आहे. ठाण्यात आनंद दिघे यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा मिंध्यांनी केली होती. यासाठी पालिकेने अर्थसंकल्पात पाच कोटींची तरतूदही केली. मात्र दहा वर्षे उलटले तरी या स्मारकाची एक वीटदेखील रचली गेलेली नाही. धर्मवीर आनंद दिघे यांचा केवळ राजकारणासाठी आणि फ्लेक्सवर फोटो छापण्यासाठी उपयोग करणाऱ्या मिंध्यांचे हेच का धर्मवीरांवरील प्रेम, असा संतप्त सवाल ठाणेकर करत आहेत.
शिवसेनेचे ठाणे जिल्ह्याचे दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांचे भव्य स्मारक व्हावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून ठाणेकर करत आहेत. त्यासाठी शिंदे गटाने ठाण्यात दिघे यांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. या स्मारकासाठी पाच कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. हे स्मारक कशारीतीने होईल याबाबतही विविध संकल्पना मांडण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात काहीच हालचाली झाल्या नाहीत. या स्मारकासाठी पालिका स्तरावर साधी बैठकही घेण्यात आली नसून महापालिका प्रशासनाकडून अद्याप प्रस्तावही तयार करण्यात आलेला नाही. परिणामी हा निधी केवळ पडूनच असून यावर निर्णय न झाल्यास हा निधी2025-26 च्या अर्थसंकल्पात फेरसादर केला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दिघे फक्त बॅनर आणि मतांपुरते?
पालिकेच्या निवडणुकीबाबत अद्यापही अनिश्चितता असली तरी प्रत्येक निवडणुकीत मिंधे गटाकडून स्मारकाचा मुद्दा पुढे केला जातो. आनंद दिघे यांच्या स्मारकाचा भावनिक विषय समोर करून फक्त बॅनरपुरते आणि मते मिळावी यासाठी खेळ केला जात आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आनंद दिघे यांच्या स्मारकाचा प्रश्न अधांतरीच आहे.
वर्षानुवर्षे वेळकाढू धोरण
ठाणेकरांचे श्रद्धास्थान असलेल्या धर्मवीरांचे स्मारक व्हावे अशी लोकभावना आहे. यासाठी उपवन येथील महापौर निवास या वास्तूमध्ये स्मारक करण्याचे प्रयोजन केल्याची घोषणा करण्यात आली. दरम्यान, स्मारकाबाबत त्वरित निर्णय अपेक्षित होते, पण वर्षानुवर्षे मिंध्यांनी फक्त वेळकाढू धोरण अवलंबिले असल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
धर्मवीरांच्या नावाचा वापर फक्त निवडणुकीत करणारे तथाकथित शिष्य निवडणूक झाल्यावर मात्र त्यांना सोयीस्करपणे विसरतात. धर्मवीरांच्या स्मारकासाठी निधीची तरतूद असतानाही अद्याप स्मारक होऊ शकले नाही. दिघे साहेबांवर प्रेम असणाऱ्या ठाणेकरांनी साहेबांच्या स्मारकासाठी आता सत्ताधाऱ्यांविरोधात एकवटले पाहिजे.
केदार दिघे, ठाणे जिल्हाप्रमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List