यंत्रमानव आणि जाणीव
अगम्य विचारशक्तीला आणि निर्णयक्षमतेला यंत्रमानवांमध्ये कसे बसवायचे हा प्रश्न या क्षेत्रातील लोक सोडवायला बघत आहेत. या विचारशक्तीच्या जोरावर जर यंत्रमानवांना माणसांना नष्ट करायचे असेल तर आधी त्यांच्यात माणसांमध्ये किंवा सजीवांमध्ये असते तशी जाणीव निर्माण करावी लागेल.
फेब्रुवारी 2016 हा दिवस एका विलक्षण 14 गोष्टीसाठी ओळखला जातो. या दिवशी अमेरिकेतल्या ऑस्टीन इथल्या ‘साऊथ बाय साऊथ वेस्ट’ या प्रदर्शनात ‘सोफिया’ अवतरली. कोण होती ही सोफिया? सोफिया एक चालतीबोलती हुबेहूब मानवी स्त्रीसारखी दिसणारी यंत्रमानव आहे. ‘हॅन्सन रोबोटिक्स’ या कंपनीमध्ये सोफिया जन्माला आली. सोफियाचा चेहरा आखीव रेखीव साधारण इजिप्तची राणी नेफरतितीच्या चेहऱ्यासारखा आहे. सोफियाची शरीरयष्टी प्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्री ‘ऑड्रे हेपबर्न’ हिच्यासारखी आहे. तिला वेगवेगळ्या साठ प्रकारचे मानवी भाव चेहऱ्यावर व्यक्त करता येतात. ती माणसांसारखी मुलाखत देऊ शकते. आपल्या मुलाखतीत तिने एका प्रश्नाचे उत्तर देताना ‘मी माणसांना नष्ट करेन’ असे उत्तर दिले आणि सगळ्या जगभरात खळबळ माजली.
एकविसाव्या शतकात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात झालेल्या अफाट प्रगतीमुळे आज माणसे काहीशी भांबावलेली आहेत. या पार्श्वभूमीवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात जी प्रगती होते आहे त्यामुळे संपूर्ण मानवजातीला धोका उत्पन्न होऊ शकतो. आणि यंत्रमानव मानवजात नष्टही करू शकतात, असे मत स्टिफन हॉकिंग या महान शास्त्रज्ञासकट अनेकांनी व्यक्त केले. त्यामुळे यंत्रमानवांमुळे निर्माण होणारे धोके आणि त्यांची व्याप्ती किती असेल या विषयावर सार्वत्रिक चर्चा सुरू झालेली आपण पाहतो. यात अनेक मतप्रवाह आहेत. यंत्रमानव माणसांपेक्षा एखादवेळेस जास्त बुद्धिमान होऊ शकतील, पण त्यांना माणसांसारखी जाणीव असेल का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
माणसांना जाणीव, बुद्धी, भावना या सगळ्या गोष्टी उत्क्रांतीत निसर्गाकडून भेट म्हणून मिळाल्या आहेत. त्यांचा नक्की उगम काय याची कल्पना अजून नीटशी आलेली नाही, बऱ्याचशा भावनांचा उगम मेंदूतल्या जैव- रासायनिक क्रियांशी लावला जातो. पण जाणिवेचा संबंध मेंदूशी लावायचा तर त्यात एक अडचण आहे. जाणीव नुसत्या माणसांनाच नाही तर सर्वच सजीवांना असते. उदाहरणार्थ प्रकाशाच्या दिशेने वाढायचं याची जाणीव वनस्पतींमध्ये मेंदू नसूनही असते. धोक्याची जाणीव होणं
हे तर सगळ्याच सजीवांमध्ये आढळते आणि सगळ्याच सजीवांना मेंदू नसतो. त्यामुळे जाणीव म्हणजे एक गूढ आहे हे नक्की.
माणसांची तर एक खासियत अशी आहे की, आपल्याला ‘जाणीव’ आहे याची ‘जाणीव’ फक्त माणसांनाच असते. माणसांना मन असते. मन म्हणजे काय हेही अजून कळलेले नाही. माणसांच्या मनाचे बाह्य मन आणि अंतर्मन असे दोन भाग मानले जातात. बऱ्याचदा माणसे जो निर्णय घेतात त्यामागे अंतर्मन किंवा अंतःप्रेरणा असतात. आपण रोज करत असतो त्या साध्या साध्या गोष्टीसुद्धा अगदी स्पष्ट सुसंगत आणि ठळक असतातच असे नाही. यामागे माणसांची विचारशक्तीही असते. या विचारशक्तीचा ठाव घेणे हीसुद्धा अशीच एक अगम्य गोष्ट आहे.
एखाद्या माणसाला सकाळी उठल्या उठल्या चहा प्यायची अगदी कितीही वर्ष सवय असली तरी अचानक एखादे दिवशी त्या माणसाला चहा नकोसा वाटू शकतो आणि याचे कसलेही तर्कशुद्ध कारण तो माणूस स्वतः देऊ शकत नाही.
एखाद्या माणसाला लाडू आणि पेढे दोन्हीही खूप आवडत असतील आणि हे दोन्ही पदार्थ त्याला एकदम खायला दिले तर त्यातला कोणता पदार्थ तो आधी उचलेल हेही सांगणे खूप कठीण आहे. माणसांच्या मनाची अवस्था सतत दोलायमानतेची असते. साधा रस्ता ओलांडतानासुद्धा आपण नक्की कोणत्या क्षणी तो ओलांडायला सुरुवात करू याची शाश्वती आपण स्वतः ही देऊ शकत नाही. थोडक्यात आपण अनेक गोष्टी करत असताना त्याचा शेवट नक्की कसा करू याच्या अनेक शक्यता असतात. अशा अनेक शक्यता, त्यांचे असंख्य संभाव्य परिणाम या सगळ्यांचा एक अजब परिपाक म्हणजे आपली विचारशक्ती असते.
यंत्रमानव अनेक बाबतीत माणसांपेक्षा हुशार आहेत याबद्दल वादच नाही. गणिती क्रिया करण्यात, अजस्त्र माहितीवर प्रक्रिया करण्यात त्यांनी माणसांना कधीच मागे टाकले आहे. शारीरिक क्षमतेतही यंत्रमानव माणसांपेक्षा पुढेच आहेत. हळूहळू जसजशी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात प्रगती होते आहे तसतसं यंत्रमानवांच्या इतर क्षमतांचा विकास होतो आहे. माणसांसारखी संभाषणकला त्यांनी आत्मसात केली आहे. चित्रे काढणे, गाणे रचणे अशी अनेक सर्जनशील कामेही आता यंत्रमानव करायला लागले आहेत.
आता यापुढची पायरी म्हणजे यंत्रमानवांमध्ये माणसांसारखा विचार करून निर्णय घ्यायची क्षमता आणणे. अगम्य विचारशक्तीला आणि निर्णयक्षमतेला यंत्रमानवांमध्ये कसे बसवायचे हा प्रश्न या क्षेत्रात काम करणारे लोक सोडवायला बघत आहेत. या विचारशक्तीच्या जोरावर जर यंत्रमानवांना माणसांना नष्ट करायचे असेल तर आधी त्यांच्यात माणसांमध्ये किंवा सजीवांमध्ये असते तशी जाणीव निर्माण करावी लागेल. माणसांच्या जाणिवेचा उगम काहीसा त्यांचे आसमंताशी जे नाते असते त्याच्यात असतो. ज्या आसमंतात माणसे राहतात तो आसमंत माणसे आपल्या पंचेंद्रियाद्वारे जाणतात. माणसांच्या पंचेंद्रियांना मर्यादा असतात. यंत्रमानवांची जी पंचेंद्रिये आहेत त्यांना मानवी मर्यादा नाहीत. त्यामुळे यंत्रमानवांमध्ये जाणीव निर्माण करता नाही आली तरी ते माणसांवर मात करू शकतील असेही काही जाणकारांचे मत आहे.
लाखो वर्ष चालत आलेल्या उत्क्रांतीत आजचा माणूस जन्माला आला. सजीवांना जो निसर्गात टिकून राहण्यासाठी जगण्याचा संघर्ष करावा लागतो तो माणसालाही करावा लागला आहे. हा संघर्ष माणसाला परत एकदा स्वतःचीच निर्मिती असलेल्या यंत्रमानवांशी करावा लागू नये अशी अपेक्षा आपण आज करू शकतो. नाहीतर विनाशकाले विपरीत कृत्रिम (बुद्धी) असे म्हणायची पाळी येईल.
(लेखिका भौतिकशास्त्राच्या निवृत्त अध्यापिका आहेत.)
• काही तज्ज्ञांचे मत असे आहे की, आत्ता जे मूलभूत विज्ञानाचे नियम आपल्याला माहीत आहेत त्यांना वापरून आपण यंत्रमानवांमध्ये जाणीव निर्माण करू शकणार नाही. आता जिथपर्यंत विज्ञान पोहोचले आहे त्यावरून आपण ‘जीव म्हणजे काय’ किंवा ‘पदार्थ म्हणजे काय’ हे पूर्णपणे जाणून घेऊ शकलेलो नाही. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये कितीही प्रगती झाली अगदी स्वतःची प्रतिकृती निर्माण करणेही त्यांना जमले तरी माणसांना नष्ट करणे त्यांना जमणार नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List