एआयची जादू
>> डॉ. रजनीश कामत
हार्वर्डच्या डॉ. सारा हॉफमन यांचे शब्द या युगाचे सार सांगतात की, एआय शिक्षणाचे भविष्य आहे, पण शिक्षक हे शिक्षणाचे हृदय आहेत. शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा संगम हा एका नव्या युगाचा प्रारंभ आहे.
आर्टिफिशल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता केवळ औद्योगिक किंवा तांत्रिक क्षेत्रापुरती सीमित राहिली नाही, ती आता आपल्या शाळा, महाविद्यालये आणि विद्यार्थी यांच्या शिक्षण पद्धतींवर लक्षणीय प्रभाव टाकत आहे. एआयमुळे शिक्षण केवळ अधिक व्यक्तिगत आणि समृद्धच झाले नाही, तर ते अधिक सुलभ, सर्वसमावेशक आणि आधुनिक बनले आहे, आणि आता एआयच्या मदतीने वैयक्तिक शिक्षणाच्या प्रवासापर्यंत शिक्षणाचा चेहराच बदलून गेला आहे.
आता कल्पना करा एका अशा वर्गाची, जिथे शिक्षक विविध प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या गरजांवर कुशलतेने लक्ष केंद्रित करतात आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या गतीने शिकण्याचा अनुभव मिळतो. जनरेटिव्ह एआय (GenAI) हे आधुनिक शिक्षणातील आधारस्तंभ म्हणून उदयाला येत आहे, जिथे शिक्षणाच्या पद्धती आणि शैक्षणिक संस्थांचे कामकाज दोन्ही बदलत आहेत. तंत्रज्ञान शिक्षणात क्रांतिकारक बदल घडवत आहे. एआय फक्त तंत्रज्ञान नाही, तर शिक्षणातील नव्या पर्वाचा पाया आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्राला समृद्ध आणि सुसंस्कृत करण्यासाठी नवी दृष्टी मिळाली आहे.
पूर्वीच्या काळात शिक्षण मुख्यतः वर्गाधारित पद्धतीने दिले जाई. यात शिक्षकांचे लक्ष प्रत्येक विद्यार्थ्यावर समान पद्धतीने जात नसे. प्रत्येकाचा गतीमान वेग, अभ्यासाची पद्धत आणि आवड वेगळी असल्यामुळे शिकण्याच्या प्रक्रियेत काही विद्यार्थी मागे राहत. इंटरनेट, स्मार्टफोन आणि संगणकांनी शिक्षण डिजिटल केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या शिक्षण घेण्याची संधी मिळाली. तथापि यामध्ये वैयक्तिकरणाचा अभाव होता. एआयमुळे आता शिक्षण अधिक वैयक्तिकृत (Personalized) झाले आहे. एआय प्रणाली, जसे की अॅडॅप्टिव लर्निंग सॉफ्टवेअर, प्रत्येक विद्यार्थ्याच्या गतीनुसार आणि गरजेनुसार शिक्षणाचा वेगळा आराखडा तयार करते. उदा. गणित शिकताना एखाद्या विद्यार्थ्याला ज्या ठिकाणी अडचण येते, तेथे एआय आधारित अॅप त्याला अधिक सराव देऊ शकते.
2025 नंतर जन्माला येणाऱ्या मुलांबद्दल विचार करा तज्ज्ञ त्यांना जनरेशन बीटा (Generation Beta) म्हणत आहेत आणि त्यांचं बालपण एका आश्चर्यकारक जगात होणार आहे, ज्याची आपण आज कल्पना करू शकतो. ही पिढी अशा जगात वाढेल जिथे एआय सहाय्यक (AI Assistants) नेहमीच असतील आणि जिथे व्हर्चुअल रिअॅलिटी क्लासेस घेणं तितकंच नैसर्गिक असेल जितकं आपण कधी पेन्सिलने टिपणं घेणं मानत होतो.
जगभरात एआयचा वापर पर्सनलाइज्ड लर्निंग आणि व्हर्चुअल ट्यूटरसाठी केला जात आहे. भारतात NCERT ने एआय आधारित अभ्यासक्रम तयार करण्यास सुरुवात केली आहे. तसेच डिजिटल इंडिया मोहिमेमुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली आहे. DIKSHA सारख्या प्लॅटफॉर्मवर एआयआधारित अभ्यासक्रम ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी सहज उपलब्ध होत आहेत.
तंत्रज्ञान शिक्षणाचा अभिन्न भाग बनले आहे, पण त्याचा जबाबदारीने आणि योग्य वापर गरजेचा आहे. एआयने शिक्षण क्षेत्राला अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, पण त्याचा वापर करताना तो मानवी स्पर्श गमावू नये याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आजच्या विद्यार्थ्यांसाठी एआय म्हणजे भविष्याची शाळा आहे, पण माणूसपण जपून हे भविष्य घडवावे लागेल.
शिक्षणाचे नव्या दिशेने होणारे परिवर्तन
एआयमुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पद्धतीत मोठे बदल झाले आहेत. प्रत्येक पिढीचे शिक्षणाशी नाले वेगळे असते. X पिढी ( 1965-1980) ही पिढी प्रामुख्याने पुस्तकांवर आधारित शिकत होती. तंत्रज्ञानाचा वापर खूपच मर्यादित होता. Y पिढी (1981-1996): इंटरनेटचा उगम आणि वापर वाढल्यामुळे शिक्षणाला डिजिटल स्वरूप मिळाले. Z पिढी (1997-2012) स्मार्टफोन, ऑनलाइन अभ्यासक्रम आणि ई-लर्निंग प्लॅटफॉर्म यामुळे शिक्षण सहज उपलब्ध झाले. अल्फा पिढी (2013 नंतर) एआय आणि व्हच्र्युअल रिअॅलिटीसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानात ही पिढी वाढत आहे. एआयच्या मदतीने ही पिढी अधिक जाणीवपूर्वक आणि आकर्षक पद्धतीने शिकत आहे.
[email protected]
(लेखक डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ, मुंबईचे कुलगुरू आहेत.)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List