रुग्णालयातून बाहेर पडताच सैफ इतका फिट कसा? संजय निरुपम यांचा सवाल
घरात शिरलेल्या चोराने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या अभिनेता सैफ अली खानला मंगळवारी दुपारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. सैफवर दोन गंभीर शस्त्रक्रिया करण्यातत आल्या असून त्याची प्रकृती स्थिर असल्याने लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला घरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता एकंदर या घटनेवरून आणि सैफला पाच दिवसांत डिस्चार्ज मिळण्यावरून शिवसेना नेते संजय निरुपम यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. रुग्णालयातून बाहेर पडताच सैफ इतका फिट कसा, असा सवाल त्यांनी केला आहे. संजय निरुपम यांनी यासंदर्भात एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहिली आहे.
संजय निरुपम यांचं ट्विट-
‘डॉक्टरांनी म्हटलं होतं की सैफ अली खानच्या पाठीत 2.5 इंच आतमध्ये चाकू घुसला होता. कदाचित तो चाकू आत अडकला असावा. सलग सहा तास शस्त्रक्रिया झाली. हे सर्व 16 जानेवारी रोजी घडलं. आज 21 जानेवारी आहे. रुग्णालयातून बाहेर पडताच सैफ इतका फिट? तेसुद्धा फक्त पाच दिवसात? कमाल आहे,’ असं ट्विट निरुपम यांनी केलंय. त्यांच्या या ट्विटवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
डॉक्टरों का कहना था कि
सैफ अली खान की पीठ में 2.5 इंच अंदर तक चाकू घुसा था।
संभवत: अंदर ही फँसा था।
लगातार 6 घंटे ऑपरेशन चला।
यह सब 16 जनवरी की बात है।
आज 21 जनवरी है।
अस्पताल से निकलते ही इतना फिट ?
सिर्फ़ 5 दिन में ?
कमाल है !#SaifAliKhan pic.twitter.com/7tCT9g0jx8— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) January 21, 2025
याशिवाय ‘इंडिया टुडे’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत निरुपम म्हणाले, “अडीच इंचाचा चाकू त्याच्या शरीरात अडकला होता आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. पण फक्त पाच दिवसांत सैफ रुग्णालयातून बाहेर पडतो, उड्य मारतो आणि असा चालतोय जसं काही झालंच नाही. इतक्या लवकर बरं होणं शक्य आहे का? सैफ लवकरात लवकर बरा व्हावा अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. जेव्हा हा हल्ला झाला, तेव्हा संपूर्ण मुंबई शहरातील सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झाला होता. सरकारच्या कार्यक्षमतेवरून सवाल करण्यात आले. सैफला जेव्हा रुग्णालयात आणलं गेलं, तेव्हा तो रक्ताने माखलेला होता, असं डॉक्टरांनी सांगितलं. मग हॉस्पिटलमध्ये जातानाचा त्याचा सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे? अल्पवयीन मुलगा त्याच्या वडिलांना अशा परिस्थितीत रुग्णालयात घेऊन जाऊ शकतो का? सैफच्या घरात आठ कर्मचारी होते, मग हा हल्ला झालाच कसा?”
संजय निरुपम यांनी पोलिसांच्या चौकशीवर प्रश्न उपस्थित करत हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद असल्याचं म्हटलंय. याविषयी ते पुढे म्हणाले, “तीन दिवसांत पोलिसांनी तीन वेगवेगळ्या लोकांना अटक केली. आरोपी खरंच बांगलादेशी आहे का? पोलिसांच्या कारवाईबद्दल शंका उपस्थित होत आहेत. या प्रकरणात काही मोठं षडयंत्र आहे का, ते आपल्याला पहावं लागेल. संपूर्ण प्रकरण मला गोंधळात टाकणारं आणि संशयास्पद वाटतंय.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List