नावे बदलली, नदी ओलांडून मेघालय अन् बंगालमध्ये जाऊन; सैफ अली खानचा हल्लेखोर डंकी स्टाइलने भारतात घुसला?
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करुन त्याला गंभीर जखमी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. तसेच तपासात अनेक महत्त्वाची माहितीही पोलिसांच्या हाती लागत आहे. . शरीफुल हा बांगलादेशी नागरिक असून त्याला अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत.
30 वर्षीय शरीफुलला सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर तीन दिवसांनी ठाण्यातून अटक केली आहे. चोरीच्या उद्देशाने वांद्रे येथील सैफ अली खानच्या घरात घुसलेल्या शरीफुलने सैफ अली खानवर चाकूने हल्ला केल्याचंही समोर आलं.
आरोपी नक्की भारतात घुसला कसा?
अजून एक धक्कादायक खुलासा म्हणजे हा आरोपी नक्की भारतात घुसलाच कसा? तपासात याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे की,आरोपीने बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला. एवढच नाही तर त्याने आपलं नावही बदलल होतं.
शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमिन फकिर असं आरोपीचं पू्ण नाव असून भारतात घुसण्यासाठी सात महिन्यांपूर्वी त्याने दावकी नदी ओलांडून मेघालयात पोहोचला होता होती. यानंतर त्याने सीम कार्ड खरेदी करण्यासाठी पश्चिम बंगालमधील रहिवाशाचं आधार कार्ड वापरलं होतं असं वृत्त मुंबई पोलिसांच्या हवाल्याने दिल्याचं एका रिपोर्टमधून समोर आलं आहे.
दावकी नदी ओलांडली अन्…
प्राथमिक चौकशीत समोर आलं की, फकीर ज्या सिमकार्डचा वापर करत होता तो पश्चिम बंगालमधील खुकुमोनी जहांगीर शेख या नावाने नोंदणीकृत होतं. पोलीस सूत्रांचा हवाला देत एका रिपोर्टनुसार फकीरने सीमकार्ड मिळवण्यासाठी शेखच्या आधार कार्डचा वापर केल्याचा संशय आहे. तो काही आठवडे पश्चिम बंगालमध्ये फिरला आणि स्वतःसाठी आधार कार्ड बनवण्याचा प्रयत्नही केला, परंतु तो त्यात अयशस्वी झाला.
तसेच फकीरने पोलिसांना सांगितले की त्याने बांगलादेशात बारावीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. नोकरीच्या शोधात तो भारतात आला होता. त्याने मेघालयातील भारत-बांगलादेश सीमेवर असलेली दावकी नदी ओलांडून भारतात प्रवेश केल्याचा दावा केला जात आहे. भारतात तो बिजॉय दास या बनावट ओळखपत्राने वावरत होता अशी माहिती समोर आली आहे
कागदपत्रांची गरज नाही अशा नोकऱ्या शोधल्या
बंगालमध्ये काही आठवडे घालवल्यानंतर, तो नोकरीच्या शोधात मुंबईत आला. फकीरने कोणतीही कागदपत्रे लागणार नाही अशाच नोकऱ्या शोधल्या. रिपोर्टनुसार, अमित पांडे नावाच्या कामगार कंत्राटदाराने ठाणे आणि वरळी परिसरातील पब आणि हॉटेलमध्ये घरकामाचं काम मिळवून देण्यासाठी फकीरला मदत केली.
सुरुवातीला, फकीरने पोलिसांना सांगितलं की तो कोलकाता येथील रहिवासी आहे. तथापि, त्याच्या कॉल रेकॉर्डची तपासणी करताना, अधिकाऱ्यांना बांगलादेशातील नंबरवर अनेक फोन कॉल आढळले. फकीरने बांगलादेशातील त्याच्या कुटुंबाला कॉल करण्यासाठी मोबाइल अॅप्सचा वापर केला होता, असं त्यांनी सांगितलं.
आरोपीच्या भावाने त्याच्या फोनवर पाठवले महत्त्वाचे प्रमाणपत्र
त्यानंतर पोलिसांनी आरोपीला त्याच्या कुटुंबातील एखाद्याला फोन करायला लावला. “त्याने त्याच्या भावाला फोन केला आणि त्याचे शाळेतील लिविंग सर्टिफिकेट पाठवण्यास सांगितलं. त्याच्या भावाने ते (प्रमाणपत्र) फकीरच्या मोबाइल फोनवर पाठवले. हे कागदपत्र तो बांगलादेशी नागरिक असल्याचे सिद्ध करण्यासाठी एक भक्कम पुरावा ठरत असल्याचं,एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.
सैफच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी, आरोपीचा अजून एका बॉलिवूड सुपरस्टारच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न
सैफ अली खानच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी, आरोपीने जवळच्या दुसऱ्या बॉलिवूड सुपरस्टारच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला होता. पण कुत्रे भुंकू लागल्याने त्याला घरात घुसण्यास यश आलं नाही. म्हणून मग त्याने सैफ राहत असलेल्या सोसायटीत प्रवेश केला. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार फकीरने सैफ अली खानवर त्याच्या अपार्टमेंटमध्ये चाकूने वार केल्यानंतर एका बागेत दोन तास लपून बसला होता असही म्हटलं जात आहे.
आरोपी शरीफुलला पुन्हा ‘सदगुरू शरण’ इमारतीमध्ये नेऊन सैफवर केलेल्या हल्ल्याचे पोलिस रिक्रिएशन 21 जानेवारीच्या पहाटे करण्यात आलं. त्यामधूनही बरीच माहिती उघड होतील असही तपास अधिकारी म्हणाले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List