सलमानच्या घराच्या बाल्कनीला बुलेटप्रुफ काच, भिंतीवर काटेरी तार..; सुरक्षेच्या कारणास्तव मोठे बदल
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणात मोठा खुलासा झाल्यानंतर अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सलमान खानच्या घराच्या बाल्कनीमध्ये बुलेट प्रूफ काच लावण्यात येत आहे. गॅलेक्सी अपार्टमेंटच्या सीमा भिंतीवर काटेरी तारही टाकण्यात येत आहे. त्याचसोबत ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. एवढंच नाही तर अत्याधुनिक सुरक्षा उपकरणंही याठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. पोलिसांनी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सुरक्षा चौकीही तयार केली आहे. बाबा सिद्दीकी यांची दसऱ्याला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर सलमानच्या घराबाहेर कडक पोलीस बंदोबस्त पहायला मिळतोय. सिद्दिकींच्या हत्येमागे सलमानशी जवळीक असल्याचं कारण पोलिसांसमोर उघड होताच पोलीस सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्यात आली आहे.
गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईकडून सलमानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. इतकंच नव्हे तर त्याच्या गॅलेक्स अपार्टमेंटबाहेर दोन अज्ञातांनी गोळीबारसुद्धा केला होता. त्यातील एक गोळी गॅलेक्सीच्या बाल्कनीच्या भिंतीला लागली होती. आता सुरक्षेचा कडक उपाय म्हणून या बाल्कनीला निळ्या रंगाची बुलेटप्रूफ काच लावण्यात आली आहे. दरवर्षी ईद, दिवाळी आणि वाढदिवशी सलमान याच बाल्कनीत उभं राहून चाहत्यांना अभिवादन करतो आणि त्यांचे आभार मानतो. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते गॅलेक्सीसमोर गर्दी करतात. मात्र आता सुरक्षेच्या कारणास्तव गॅलेक्सी अपार्टमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. बाल्कनीसोबतच घराच्या खिडक्यांनाही बुलेटप्रूफ काच लावण्यात आली आहे.
गँगस्चर लॉरेन्स बिष्णोईने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. ‘जो कोणी सलमान खान आणि दाऊद यांची मदत करणार, त्याने आपला हिशोब तयार ठेवावा’, अशी धमकी बिष्णोईने फेसबुकवरील पोस्टद्वारे दिली होती. त्यानंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. वांद्रे इथल्या सलमानच्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’बाहेर 24 तास पोलिसांचा पहारा असणार आहे.
गॅलेक्सी अपार्टमेंट्स कॉम्प्लेकच्या बाहेर अनधिकृत व्यक्ती आणि चाहत्यांना जमण्यास मनाई आहे. सलमानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. यामध्ये आठ ते दहा सशक्त पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असतो. सलमानला कुठेही जायचं असल्यास स्थानिक पोलीस ठाण्याशी समन्वय साधून तो परिसर आधी सुरक्षित केला जातो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List